सकाळी 10 ते 12 दूध विक्रीस परवानगी
फक्त मेडिकलची दुकाने सुरू राहणार
दुधाच्या वाहतुकीवर नाही तर घरी जाऊन वितरणावर बंधन
पुणे – करोनाचा सर्वाधिक संसर्ग असलेल्या 10 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत. या ठिकाणी फक्त सकाळी 10 ते 12 या काळात दूध विक्रीस परवानगी दिली आहे. पुण्याचे पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी मंगळवारी रात्री हे आदेश काढले. दुधाच्या वाहतुकीवर बंधन राहणार नाही. मात्र, घरी जाऊन दूध वितरणावर बंधन राहणार आहे. 24 एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत हे आदेश लागू राहतील. किराणा, ई-कॉमर्स, मटण-चिकन या सेवा पूर्णपणे बंद राहतील. फक्त मेडिकलची दुकाने सुरू राहणार आहेत.
पुण्यातील 711 करोधाबाधित रुग्णांपैकी 80 टक्के रुग्ण याच परिसरात आढळले आहेत. भवानी पेठ 168, कसबा-विश्रामबागवाडा 102, ढोले पाटील रस्ता प्रभाग 97, येरवडा 68, धनकवडी-सहकारनगर 38, वानवडी रामटेकडी 32 आणि बिबवेवाडी प्रभागात 24 रुग्ण सापडले आहेत. हा परिसर अतिसंक्रमित घोषित केला आहे. यामुळे येथे पोलीस कडक भूमिका घेणार आहेत. दरम्यान, मंगळवारी केंद्रीय आरोग्य पथकाने शहरातील करोना संदर्भातील परिस्थितीची पाहणी केली. यानंतर रात्री उशिरा हे आदेश काढले.
नागरिकांना गांभीर्य नाही…
राज्यात मुंबई आणि पुण्यात सर्वाधिक करोनाबाधित आणि मृतांची संख्या आहे. यामुळे लॉकडाऊनचा निर्णय केंद्र व राज्य सरकारने घेतल्यानंतर पुणेकर गांभीर्याने वागतील, अशी अपेक्षा होती. मात्र, दररोज भाजी खरेदीला बाहेर पडणे, मॉर्निंग वॉकला जाणे, किराणाच्या दुकानांत रोजच्या रोज खरेदीला जाणे, मटणांच्या दुकानांबाहेर भल्या मोठ्या रांगा लावणे अशाप्रकारे लॉकडाऊनचे नियम पायदळी तुडवले जात होते. दरम्यान, सुरवातीला शहरातील मध्यवर्ती भाग आणि नुकतेच पूर्ण शहर सील केले आहे. यानंतरही नागरिक घरात थांबताना दिसत नाहीत. यामुळे जवळपास 24 हजार नागरिकांची वाहने जप्त केली आहेत. तसेच, शेकडो नागरिकांवर गुन्हे दाखल केले. तरीही नागरिक पोलिसांना दाद देताना दिसत नाहीत. यामुळे अखेर पोलिसांना भाजीपाला आणि किराणा विक्रीची दुकानेच बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागला.
प्रतिबंधित पोलीस ठाणे, त्यांचे भाग
समर्थ, खडक आणि फरासखाना पोलीस ठाण्यांचा पूर्ण भाग
स्वारगेट पोलीस ठाणे-गुलटेकडी, महर्षीनगर, डायस प्लॉट
बंडगार्डन पोलिस ठाणे- ताडीवाला रोड
दत्तवाडी पोलीस ठाणे- जनता वसाहत, पर्वती दर्शन परिसर, शिवदर्शन
येरवडा पोलीस ठाणे-लक्ष्मीनगर, गाडीतळ
खडकी पोलीस ठाणे-खडकी बाजार, कसाई मोहल्ला, पाटील इस्टेट झोपडपट्टी
कोंढवा पोलीस ठाण्याचा पूर्ण भाग
वानवडी पोलीस ठाणे- विकासनगर, सय्यदनगर, रामटेकडी, वॉर्ड क्रमांक 24, हांडेवाडी, वॉर्ड क्रमांक 26 व 28.