पुणे – शहरात मागील काही दिवसांत गल्ली-बोळांतील कथित भाई शस्त्र दाखवत व्हॉट्स ऍप स्टेटस ठेवत आहेत. तर, काही चित्रपटांत पाहून तलवारीने केक कापायचे फॅड निर्माण झाले आहे. यातील एक कोयताभाई ऊर्फ यमभाईने कोयता घेऊन “…काही लोकांचे ऐकून कुत्रीही चालतात, पण आमची सूत्रं येरवडा जेलमधून हलतात,’ अशा आशयाचे व्हिडिओ शेअर केले आहेत.
हे प्रमाण वाढत असल्याचे समजताच पुणे पोलिसांनी कारवाईचा फास आवळला. पोलीस आता प्रत्येक गुन्हेगार व संशयित गुन्हेगाराच्या मोबाइलमधील स्टेटस तपासत आहेत. भाईगिरी करणारे स्टेटस दिसल्यास त्याला पुणे पोलिसांचा पॅटर्न दाखवला जात आहे.
भाईका बड्डे… पण, पोलिसांनी वाजवले “बारा’
“अजिंक्य राजगुरू (27, रा. येरवडा) याने त्याच्या वाढदिवशी सार्वजनिक ठिकाणी तलवारीने केक कापला आहे. ते फोटो त्याने फेसबुकवर टाकले आहेत. तो तलवारीसह आझाद आळी, येरवडा गावठाणात फिरत आहे,’ अशी माहिती गुन्हे शाखा युनिट-1 चे पोलीस अंमलदार इम्रान शेख व तुषार माळवदकर यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आझादनगर परिसरात सापळा रचून राजगुरू यास तलवारीसह ताब्यात घेतले आहे. त्याचे ताब्यातुन 38 इंच लांब दुधारी पाते व नक्षीदार मुठ असलेली तलवार हस्तगत करण्यात आलेली आहे. आरोपीविरुद्ध 2016 मध्ये कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात विविध प्रकरणांत गुन्हा दाखल आहे, असे पोलिसांनी सांगितले.