आता उद्योगांनी जोखीम घेऊन… – अर्थमंत्री सीतारामन यांचा उद्योजकांना आग्रह

नवी दिल्ली – अर्थव्यवस्थेच्या सर्व बाबी करोनापूर्व पातळीवर आल्या आहेत. आता उद्योगांनी जोखीम घेऊन उत्पादकता वाढविण्यासाठी विस्तारीकरणाचे काम हाती घ्यावे असा आग्रह अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला आहे.

भारताने आयात कमी करण्यासाठी करोनाचा प्रादुर्भाव होण्याअगोदर आत्मनिर्भर भारत धोरण स्वीकारले होते. आता आयातीला पर्याय ठरणारी उत्पादने उद्योजकांनी नवी गुंतवणूक करून विकसित करावी. याकामी उद्योगांना आवश्‍यक ती मदत करण्यात येईल. भारतीय उद्योग महासंघाच्या कार्यक्रमात बोलताना त्या म्हणाल्या की, खासगी गुंतवणूक वाढल्याशिवाय अर्थव्यवस्थेला खऱ्या अर्थाने गती येणार नाही.

त्यामुळे उद्योजकांनी आणखी वाट न पाहता विस्तारीकरणाचे काम लवकरात लवकर हाती घ्यावे. मनुफॅक्‍चरिंग क्षेत्राने विस्तारीकरणासाठी पुढाकार घ्यावा. त्यामुळे रोजगार निर्मिती वाढेल. उद्योग करणे सोपे व्हावे याकरिता आवश्‍यक त्या आर्थिक सुधारणा करण्यात आलेल्या आहेत.

आगामी काळातही या सुधारणा चालूच राहतील असे त्यांनी सांगितले. करोनाच्या काळातही भारत जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थापैकी होता असे त्या म्हणाल्या.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.