“आता जर इतरांच्या भानगडी बाहेर काढल्या तर विषय खूप लांब जाईल”- अजित पवार

पुणे : राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेने तक्रार मागे घेतली आहे. पण हे प्रकरण काही केल्या थांबत नाही. दरम्यान, या प्रकरणावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांचा समाचार घेतला आहे. ‘आता जर इतरांच्या भानगडी बाहेर काढल्या तर विषय खूप लांब जाईल, कशाला खोलात जाण्यास सांगताय’, अशा शब्दांत अजित पवार यांनी जोरदार टीका केली आहे.

अजित पवार यांनी पुणे जिल्हा नियोजन आढावा बैठक घेतली. लॉकडाऊन नंतरची ही पहिलीच बैठक होती. त्यानंतर पत्रकारांशी बोलत असताना कृषी कायद्यापासून ते धनंजय मुंडे यांच्या प्रकरणावर सडेतोड उत्तर दिली. ‘आता विरोधक काय म्हणतील याचा नेम नाही. आधी भाजपच्या नेत्यांनी धनंजय मुंडे यांच्या प्रकरणाचे समर्थन केलं होतं. नंतर त्या महिलेनं तक्रार मागे घेतल्यामुळे तोंडघशी पडले. आता थातूरमातूर उत्तर दिली जात आहे. आणि त्यामध्ये लोकांची दिशाभूल केली जात आहे’ अशी टीका अजित पवार यांनी केली.

तसेच, ‘धनंजय मुंडे यांनी करुणा शर्माबाबत जे सांगायचं होतं ते त्यांनी जाहीरपणे सांगितले आहे. विरोधकांनी उगीच फाटे फोडू नये. मग इतराच्या भानगडी बाहेर काढायला गेलं तर विषय खूप व लांब जाईल. कुणी काय काय लपवाछपवी केली, कुणाचे लग्न झाले होते, कुणाला किती मुलं होती. लग्न झालं होतं की नाही झालं, कुणाच्या किती बायका आणि कुणी किती मुलं लपवली आहेत हे काय आम्हाला ठाऊक नाही का? अशा बऱ्याच गोष्टी आहे, कशाला खोलात जाण्यास सांगत आहात, असं म्हणत अजित पवार यांनी आपल्या स्टाईलने भाजप नेत्यांना जोरदार प्रत्युउत्तर दिले.

तसंच, त्या 3 केंद्रीय शेतकरी कायद्याला राज्यात आता स्थगिती मिळाली आहे. शेतकऱ्यांना अडचणीत आणणाऱ्या कोणत्या कायद्याला आमचे समर्थन नाही, असंही अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. मला अनेक नेते हे भेटायला येत असतात. काही विकासकामांच्या निमित्ताने भेटत असतात. त्यामुळे या भेटींचा कोणताही राजकीय अर्थ काढू नका, असंही अजित पवार म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.