ओबीसी स्वतंत्र जनगणनेसाठी मंत्र्यांचेच आंदोलन

विजय वडेट्टीवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

जालना – महाराष्ट्रात बारा बलुतेदारांच्या अनेक जाती असताना ओबीसी समाजात कुणी घुसण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही पहारेकरी उभे आहोत. बहुजन कल्याण विभाग मंत्री म्हणून ओबीसींच्या स्वतंत्र जनगणनेची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केलेली आहे. आवश्‍यकता पडल्यास स्वतंत्र जनगणनेचा प्रस्ताव मी विधानसभेत मांडेन. जेथे संधी मिळेल तेथे ओबीसी समाजाचा आवाज उचलून धरणार. पक्ष, जात विसरून फक्त आणि फक्त ओबीसी म्हणून उभा आहे, असं विधान राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार जालन्यात केलं आहे.

ओबीसीच्या स्वतंत्र जनगणनेच्या मागणीसाठी राज्य सरकारमधील एक मंत्री आंदोलनात उतरल्याचे चित्र यानिमित्ताने महाराष्ट्राला पहायला मिळाले.

यावेळी वडेट्टीवार यांनी भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची देखील आठवण काढली. आपल्याला लढण्याची प्रेरणा गोपीनाथ मुंडे यांच्याकडूनच मिळाली असल्याचे त्यांनी बोलून दाखवलं व त्यांच्या संघर्षाला सलाम देखील केला. मी पक्ष, धर्म, जात-पात सोडून केवळ ओबीसीसाठी लढत असल्याचेही वडेट्टीवार यावेळी म्हणाले.

ओबीसी समाजाची स्वतंत्रपणे जनगणना व्हावी, या मागणीसाठी जालन्यात महामोर्चा काढण्यात आला होता. यावेळी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासह अनेक प्रमुख ओबीसी नेत्यांची उपस्थिती होती. यावेळी मोर्चेक-यांकडून आता मुख्यमंत्री ओबीसीचाच असे बॅनर्सही झळकवण्यात आल्याचे दिसून आले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.