मुंबई: माझ्यावर अशी टीका होते की वडिलांमुळे मला हे सगळे मिळाले. त्यामुळे मला शून्यावर जाऊन पुन्हा काम करायचे आहे. मला आता स्वतःला पाहायचे आहे. मी किती मुंडे साहेबांमुळे आहे आणि किती स्वत:च्या कामामुळे. मी स्वतःला आधीच सिद्ध केले आहे. मात्र पुन्हा शून्यावर जाऊन काम करुन स्वत:ला सिद्ध करायचे आहे, अशा भावना भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केल्या आहेत.
मुंडे म्हणाल्या, मी आमदार झाले नाही, पण माझ्यामुळे अनेक आमदार झाले याचा आनंद आहे. मी फेसबुकवर पोस्ट लिहिली त्यावेळी माजी मंत्री लिहू नका, असे मी सांगितले होते. ट्विटर हॅंडलवर कधी कमळ नव्हते, त्यामुळे कमळ त्यावेळीच नव्हते, असे म्हणणे चूक आहे. त्यावेळी माझ्या मनात खदखद नव्हती, आता आपण आमदारही नाहीत. त्यामुळे पुढे काय करायचे हे ठरवायचे होते. त्यासाठी ती पोस्ट लिहिली होती, असे त्या म्हणाल्या. मी पक्ष सोडण्याच्या वावड्या का कुठल्या माहिती नाही, मी आजिबात तणावाखाली नाही, पण अस्वस्थ आहे. मी पॉवर गम खेळतेय असे वातावरण तयार झाले. मी दबाव तयार करतेय अशी चर्चा झाली, असे त्या म्हणाल्या.
मुंडे म्हणाल्या की, मला त्या चर्चेला विराम द्यायचा होता. त्यामुळे कोअर कमिटीतून काढा, असे म्हटले. मला आता भाजप कार्यकर्ती म्हणून काम करायचे आहे. एनजीओच्या माध्यमातून काम करायचे आहे. मी बंड का करू, मी पक्ष का बदलू? असेही त्या म्हणाल्या. मी भाजप सोडणार नाही. भाजपने मला सोडायचे का नाही ते त्यांनी ठरवावे. मी कोअर कमिटीत आता मी जाणार नाही. मी हे पद स्वतःसाठी सोडले असल्याचे देखील त्यांनी सांगितले.