नगर -वाढत जाणाऱ्या वाहनांमुळे शहरांतील प्रदूषणाची समस्या अत्यंत गंभीर बनली आहे. मोठ्या शहरात तर प्रदूषण इतके वाढले आहे, की यामुळे मानवी आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रदूषणामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. या घातक समस्येवर मात करण्यासाठी प्रयत्न होत असले तरी त्याचा फारसा फरक पडलेला नाही. मोठ्या शहरांत प्रदूषण किती आहे, याची माहिती तरी होते मात्र, लहान शहरात तीही परिस्थिती नाही. या शहरांतील हवेची गुणवत्ता काय आहे, याची काहीच माहिती लोकांना मिळत नाही. या गोष्टी लक्षात आल्याने प्रदूणषण नियंत्रण मंडळाने एक महत्वाचा निर्णय घेतला होता. आता या निर्णयाची अंमलबजावणी नगर शहरात सुरू झाली आहे.
शहरातील न्यू आर्टस कॉलेजच्या परिसरात कॉम्पॅक्ट एअर क्वालिटी मॉनिटरींग स्टेशन सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे आता नगरकरांनाही शहरातील हवेची गुणवत्ता काय आहे, प्रदूषणाचे प्रमाण किती आहे, याची माहिती मिळणार आहे. शहरात रोज हजारोंच्या संख्येने नवीन वाहने रस्त्यांवर येत आहेत. त्यामुळे वायू प्रदूषणात सातत्याने वाढ होत आहे. इंधनाच्या ज्वलनाने अनेक घातक वायू वातावरणात पसरत असल्याने मानवी आरोग्य संकटात सापडले आहे. फुप्फुसांच्या आजारासह अनेक व्याधी निर्माण झाल्या आहेत. वाढत जाणारे प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रदूषणाचे प्रमाण किती आहे. याचे मोजमाप शहरात होत नव्हते. त्यामुळे शहरातील प्रदूषणाबाबत लोकांना माहिती मिळत नव्हती. आता मात्र असे होणार नाही. शहरातील हवेची गुणवत्ता कशी आहे, याचा अंदाज आता मिळणार आहे. संपूर्ण शहरातील नाही पण, जास्त वाहनांची गर्दी असलेल्या दिल्ली गेट परिसरातील हवेच्या गुणवत्तेची माहिती मिळणार आहे.
या परिसरात वाहनांची वर्दळ जास्त आहे. दवाखान्यांची संख्याही जास्त आहे. मनमाडकडे जाणारा हा रस्ता आहे. तसेच शहरातील अनेक रस्ते या रस्त्याला येऊन मिळतात. त्यामुळे येथे वाहनांची वर्दळ जास्त आहे. दिवसभरात हजारो वाहने ये-जा करत असतात. त्यामुळे वाहनांद्वारे होणाऱ्या प्रदूषणाचे प्रमाणही जास्त आहे. त्यामुळेच प्रदूषण नियंत्रण मंडळाने येथे हे स्टेशन सुरू केले आहे. याठिकाणी हवेतील धुलीकण (पीएम 10), श्वसनावाटे शरीरात जाऊ शकणारे धुलीकण (पीएम 2.5), सल्फर डायऑक्साइड आणि नायट्रोजन या घटकांची तपासणी होणार आहे. हे घटक हवेत किती प्रमाणात आहेत, या घटकांचे प्रमाण वाढले आहे का, याची माहिती मिळणार आहे. यासाठी येथे मोठा डिस्प्ले लावण्यात आला आहे. त्याद्वारे शहरातील हवेच्या गुणवत्तेबाबत माहिती मिळणार आहे, अशी माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयातून देण्यात आली.