इंदूर – मी राजकारण जाणतो. जनतेची इच्छा असल्यास राजकारणात सक्रिय होण्याची माझी तयारी आहे. राजकारणात उतरून जनतेची मोठ्या प्रमाणात सेवा करणे शक्य होईल, अशी भावना कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांनी व्यक्त केली.
वढेरा यांनी मध्यप्रदेशच्या उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर स्थानिक युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीवेळी त्यांना राजकारण प्रवेशाच्या शक्यतेबद्दल विचारण्यात आले. उत्तरादाखल त्यांनी जनतेची इच्छा असल्यास राजकारणात प्रवेश करण्याची तयारी दर्शवली. मी दहा वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून जनसेवेचे कार्य करत आहे. मी राजकारणात प्रवेश केला किंवा नाही केला तरी ते कार्य सुरूच राहील.
पुढे काय होते ते पाहूया. आज कशा प्रकारचे राजकारण होत आहे आणि देश कसा बदलत आहे यावर आमच्या कुटूंबात चर्चा होते, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. देशातील सध्याच्या राजकीय स्थितीबाबत विचारल्यावर त्यांनी आताची स्थिती पाहून अस्वस्थ होतो, असे उत्तर दिले.
प्रियंका यांच्या निवडणुकीतील कामगिरीविषयीचा प्रश्न वढेरा यांना विचारण्यात आला. उत्तरादाखल ते म्हणाले, प्रियंका यांना मी पैकीच्या पैकी गुण देईल. त्यांनी निवडणुकीत दिवसरात्र कार्य केले. मात्र, आम्ही जनादेश स्वीकारतो. उत्तरप्रदेशातील जनतेची सेवा आम्ही पुढेही सुरू ठेऊ.