Vijay Vadettiwar – छत्रपती शिवाजी महाराजांची ‘वाघनखं’ ब्रिटनमधून भारतात आणण्यासंबंधीचा सामंजस्य करार ऑक्टोबर महिन्यात लंडन येथे करण्यात आला. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली होती. परंतु अद्याप ती भारतात न आल्याने, शिवरायांची वाघनखं कुठपर्यंत पोहोचली? असा खोचक सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले, नोव्हेंबर गेले, जानेवारी पण हुकले, सुधीरभाऊ वाघनखं कुठपर्यंत पोहोचली? थाटामाटात विमानतळावर ढोल वाजवून, सरकारी तिजोरीतून जाहिरातबाजी करत तुम्ही वाघनखं आणायला लंडन पर्यटनाला गेले. येताना मात्र रिकाम्या हाताने परत आले होते. त्यानंतर वाघनखं नोव्हेंबरमध्ये येणार, असे तुम्ही सांगितले, तो महिना गेला. वर्ष संपले, 2024 उजाडले आणि आता जानेवारीसुद्धा हुकले, पण वाघनखं काही आली नाही. आता परत लंडनवारी करणार की पुढची तारीख देणार? असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
दरम्यान, कायदेशीर प्रक्रियेला होत असलेल्या विलंबामुळे वाघनखं महाराष्ट्रात येण्यास आता मे महिना उजाडेल, असं सरकारमधील उच्चपदस्थांकडून सांगण्यात आलं आहे. जानेवारीतही ही वाघनखे येणार नाहीत. त्यासाठीची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होऊन मार्च किंवा एप्रिलमध्ये वस्तुसंग्रहालयाशी राज्य सरकारचा करार होईल आणि मे अखेरीपर्यंत ती मुंबईत येतील, असे उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितले.
ही वाघनखे आणण्यासाठी केंद्रीय सांस्कृतिक खात्याची गेल्या आठवड्यात मंजुरी मिळाली असून सध्या हे प्रकरण परराष्ट्र खात्याच्या मंजुरीसाठी प्रलंबित आहे. वस्तुसंग्रहालयाकडूनही ब्रिटिश सरकारच्या मंजुरीची प्रक्रिया सुरू आहे. केंद्र सरकार व ब्रिटिश सरकारच्या मंजुऱ्या मिळाल्यानंतर यासंदर्भातील करार होणार आहे.