नागपूर – लॉकडाऊनमध्ये शांत असलेली राज्याची उपराजधानी नागपुरात पुन्हा एकदा टोळीयुद्ध उफाळून आले आहे. एकापाठोपाठ हत्यांनी नागपूर शहर हादरून गेले आहे. पारडी परिसरातील भर बाजारापेठेत रविवारी संध्याकाळी कुख्यात गुंड प्रदीप उर्फ बाल्या वंजारीची हत्या करण्यात आली. घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली.
नागपूर शहरातील पारडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मुख्य मार्गावरील आठवडी बाजारात ही घटना घडली. बाल्याची हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी घटनास्थळावरूनच अटक केली आहे. नरेंद्र मेहर आणि त्याचा भाऊ रवी मेहर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
बाल्या वंजारी हा परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे त्याचे अनेकांशी वाद वाढले होते. पारडी मार्गावरील आठवडी बाजार भरला असताना बाल्या त्याठिकाणी असल्याची माहिती आरोपी नरेंद्र मेहर याला मिळली. त्यानंतर नरेंद्र आणि त्याचा भाऊ रवी याने भर बाजारात बाल्याला गाठून त्याची निर्घृण हत्या केली.
दरम्यान, महिनाभरापूर्वी बाल्या आणि आरोपी नरेंद्र मेहर या दोघांमध्ये भांडण झाले होते. त्याच वादातून ही हत्या झाली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला जात आहे.
नागपुरात खुनाच्या घटनांचे सत्र अजूनही सुरूच आहे. गेल्या 12 दिवसांमध्ये नागपूर जिल्ह्यात खुनाच्या 12 घटना घडल्या आहेत. तर नागपुरात शहरात आठ व्यक्तींची हत्या झाली आहे.