श्रीनगर – दक्षिण काश्मीरच्या शोपियॉं जिल्ह्यात सोमवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी 4 दहशतवाद्यांना ठार केले. त्यामुळे त्या जिल्ह्यात अवघ्या 24 तासांत 9 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश आले. मारले गेलेले सर्व दहशतवादी हिज्बुल मुजाहिदीन या संघटनेचे सदस्य होते. त्यामुळे शोपियॉंमधील चकमकी हिज्बुलसाठी जबर हादरा ठरल्या आहेत.
पिंजोरा भागात काही दहशतवाद्यांचे अस्तित्व असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली. त्यानंतर सोमवारी सकाळपासून दहशतवाद्यांच्या शोधासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली. त्या मोहिमेवेळी सुरक्षा जवानांना पाहून दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्याला जवानांनी दिलेल्या जोरदार प्रत्युत्तरामुळे दोन्ही बाजूंमध्ये चकमक झडली. त्यामध्ये 4 दहशतवादी मारले गेले.
याआधी रविवारी शोपियॉं जिल्ह्यातील रेबान भागात चकमक झडली. त्या चकमकीत सुरक्षा दलांनी एका म्होरक्यासह 5 दहशतवाद्यांना ठार केले. नागरी मालमत्तेची आणि जीविताची हानी टाळण्यासाठी सुरक्षा दलांनी पुरेशी दक्षता घेत दोन्ही मोहिमा राबवल्या.
चकमकींआधी रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. लॉकडाऊनचा गैरफायदा घेऊन जम्मू-काश्मिरात घातपाती कारवाया घडवण्याचे दहशतवाद्यांचे नापाक मनसुबे आहेत. मात्र, सतर्क सुरक्षा दलांमुळे ते मनसुबे उधळले जात आहेत. लॉकडाऊनच्या काळात काश्मिरात मोठ्या संख्येने दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे.