स्पर्धा आयोजनासाठी निधी जमा करण्याचे आयोजकांपुढे आव्हान….
टोकियो – करोनाच्या धोक्यामुळे एक वर्ष पुढे ढकलण्यात आलेली ऑलिम्पिक स्पर्धा नव्या वेळापत्रकानुसारदेखील घेता येईल का, अशी स्थिती निर्माण झाली असून स्पर्धेबाबत सुरू झालेले कवित्व आजही कायम आहे.
मूळ वेळापत्रकानुसार ही स्पर्धा 24 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत होणार होती. मात्र, करोनाचा धोका वाढत गेल्याने ही स्पर्धा एक वर्षाने पुढे ढकलण्यात आली. आता नव्या वेळापत्रकानुसार ही स्पर्धा 2021 साली 23 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. करोनाचा धोका अद्याप संपुष्टात आलेला नाही. तसेच या स्पर्धेच्या आयोजनावर यजमान जपानने प्रचंड पैसा खर्च केला आहे त्यामुळे ही स्पर्धा पुढील वर्षी ठरल्यानुसार होणे त्यांच्या अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. आता ही स्पर्धा पुढील वर्षी होत असली तरीही देशात केलेली सर्व विकासकामे तसेच स्पर्धेशी निगडित असलेली नूतणीकरणाची सर्व कामे पुन्हा एकदा सज्ज करावी लागणार आहेत व त्यासाठी पुन्हा पैसा उभा करावा लागणार आहे.
सध्या या स्पर्धेला मूळ कार्यक्रमानुसार ज्या प्रायोजकांनी सहकार्य केले होते ते आता करारातील रक्कम देण्यास तयार नाहीत, तसेच स्पर्धा झाली तरच करारातील रक्कम दिली जाईल असे त्यांनी स्पष्ट केल्याने आता त्यापूर्वी ही सर्व कामे करण्यासाठी निधी कसा उभा करायचा हा प्रश्न जपान सरकारसमोर निर्माण झाला आहे. या अडचणींवर मात करण्यासाठी जपान सरकार, त्यांची ऑलिम्पिक संघटना तसेच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटना यांच्यातील चर्चा सातत्याने वादग्रस्त ठरत आहे.
स्पर्धेला निधी कोण उभारणार या प्रश्नावर केवळ टोलवाटोलवी सुरू असल्याने स्पर्धेच्या आयोजनाबाबतची संभ्रमावस्था अद्याप कायम आहे. जर ही स्पर्धा पुढील वर्षीही घेण्यात आली नाही तर मात्र पूर्ण स्पर्धाच रद्द करण्याची नामुष्की येणार आहे.