ठाणे – कल्याण येथील व्यावसायिकाकडून दोन कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी इजाज लकडावाला अटक करण्यात आली आहे. छोटा राजन टोळीतील कुख्यात गॅंगस्टर इजाज लकडावाला यास ठाणे खंडणी विरोधी पथकाने नुकतीच अटक केली आहे. लकडावाला याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी असे तीसहून अधिक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
8 जानेवारी 2020 मध्ये लकडावाला यास मुंबई पोलिसांनी बिहार येथून अटक केली होती. तो तेव्हापासून तळोजा कारागृहात आहे. ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने त्यास तळोजा कारागृहातून चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. याच खंडणी प्रकरणात इजाज याचा चुलत भाऊ नदीम लकडावाला याचेदेखील नाव समोर आले असून त्यास देखील लवकरच ताब्यात घेण्यात येणार असल्याची माहिती ठाणे खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांनी दिली.
इजाज लकडावाला हा मुंबईतल्या नागपाडा भागात राहत असल्याने त्याचे अनेक गॅंगस्टरसोबत संबंध होते. मात्र, दाऊद व छोटा राजन टोळीत वैमनस्य पेटल्यानंतर इजाज छोटा राजन टोळीत सामील झाला होता. इजाजवर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी असे गंभीर स्वरूपाचे 25 गुन्हे मुंबईत दाखल आहेत. तर ठाण्यात देखील त्याच्या विरोधात 5 ते 6 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.