नवी दिल्ली – पुढील आठवड्यात दोन दिवस बॅंक कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. यामुळे पुढील सलग तीन दिवस बॅंका बंद राहणार आहेत. बॅंकांचे खासगीकरण करण्याच्या निर्णयाविरोधात बॅंक कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांचा संप पुकारला आहे. 1 मार्चपासून या दोन दिवस बॅंका बंद राहणार आहेत. त्यात 28 फेब्रुवारीला रविवार आला असल्याने या दिवशी बॅंकेला अधिकृत सुट्टी असणार आहे.
हैदराबादमध्ये आज झालेल्या युएफबीयुच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत बॅंकांचे खासगीकरण होत असल्याच्या निर्णयाविरोधात कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सरकारच्या या निर्णयावर असंतोष व्यक्त करीत 1 आणि 2 मार्च अशा दोन दिवस कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे.
युएफबीयुच्या बैठकीत जनरल सेक्रेटरी सी एच व्यंकटचलम म्हणाले की, बॅंकाचे खासगीकरण करण्यासंदर्भात सरकारचा विरोध केला जात आहे. यावेळी अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात बॅंक क्षेत्रासंदर्भात घेतलेल्या निर्णयावर चर्चा करण्यात आली. त्यामुळे नागरिकांना बॅंकांचे काम याच आठवड्यात पूर्ण करावे लागणार आहे.
बॅंक कर्मचाऱ्यांच्या नऊ संघटनांचा समावेश असलेल्या युएफबीयु यांनी दोन दिवसांचा संप जाहीर केला आहे. अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बॅंकांचे खासगीकरण करणार असल्याचे जाहीर केले होते. आयडीबीआय आणि एलआयसीमध्ये 2019 पासूनच खासगीकरणाला सुरुवात झाली आहे.