मुंबई : औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी नांदेड लोकसभा मतदारसंघातील भाजपचेच खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना मानहानीची नोटीस पाठवली आहे. त्याचबरोबर खासदार चिखलीकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला (पीडब्ल्यूडी) पाठवलेल्या पत्रात आपल्याला ‘ब्लॅकमेलर’ म्हटल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
शनिवारी ही नोटीस जारी करण्यात आलेल्या नोटिसीनुसार खासदार चिखलीकर यांनी 23 कोटी रुपयांची भरपाई द्यावी किंवा विनाअट सार्वजनिकरित्या माफी मागावी. तसेच सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आलेले सर्व संदेश हटवावे, अशी मागणी आमदार बंब यांनी केली आहे. चिखलीकर यांनी पीडब्ल्यूडी विभागाच्या अधिकाऱ्यांना नोव्हेंबर 2019 मध्ये लिहिलेल्या एका पत्रात म्हटले होते की, आमदार बंब यांच्या तक्रारीकडे लक्ष देऊ नका. ते एक ‘ब्लॅकमेलर’ आहेत.
दरम्यान, भाजपचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय रस्ते महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मागील महिन्यात एका कार्यक्रमात लोकप्रतिनिधींवर टीका केली होती. जेव्हाही मराठवाडा क्षेत्रात कोणत्याही प्रकारच्या पायाभूत विकासाचे काम सुरु होते. तेव्हा स्थानिक राजकीय नेते ठेकेदाराला लाच मागून त्रस्त करुन सोडतात, असा थेट आरोप केला होता. त्यांनी कोणाचेही नाव घेतले नव्हते. पण त्यांनी अशा नेत्यांना सीबीआयच्या चौकशीचा सामना करावा लागू शकतो, असा स्पष्ट इशारा दिला होता.