सातारा – माण तालुक्यातील अवैध वाळू तस्करी आणि वाळू तस्करांबरोबर अधिकाऱ्यांचे असलेले आर्थिक व्यवहारांचे साटेलोटे आज थेट विधीमंडळाच्या सभागृहात पोहचले. वरीष्ठ अधिकाऱ्यांना कसे आणि किती हप्ते दिले जातात, याविषयीची वाळू तस्कर आणि तलाठ्यांमधील ऑडिओ आणि व्हिडिओ क्लीप असणारा पेन ड्राईव्हच आमदार जयकुमार गोरे यांनी सभागृहात सादर केला. अधिकारी आणि वाळू तस्करांवर अद्याप कारवाई का करण्यात आली नाही, असा प्रश्नही त्यांनी लक्षवेधीद्वारे विचारला. या प्रकरणाची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करुन कारवाई करण्याचे आश्वासन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले.
माण तालुक्यात वाळूचा अवैध उपसा आणि वाहतूक राजरोसपणे सुरु आहे. माणगंगा नदीचे पात्र वाळू तस्करांनी कुरतडून टाकले आहे. माध्यमांमधून आवाज उठला की थातुरमातुर कारवाईचे नाटक केले जाते. अधिकाऱ्यांच्या कृपेने पुन्हा जोमात वाळूतस्करी सुरु होते. गेल्या महिन्यात तर वाळू तस्करांकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांना कसे आणि किती हप्ते दिले जातात हे दाखविणारी ऑडिओ आणि व्हिडिओ क्लीपच व्हायरल झाली. माध्यमांनी आवाज उठवल्यावर पाच तलाठ्यांवर कारवाई करण्यात आली.
आ. गोरे म्हणाले, “माण तालुक्यात वाळू तस्करांनी उच्छाद मांडला आहे. वाकी येथे पाच तलाठ्यांच्या पथकाने जेसीबी, पोकलेन, ट्रॅक्टर अशी वाळू उपसा करणारी वाहने आणि वाळूचा अवैध साठा पकडला होता. त्या ठिकाणी सगळे वाळू तस्कर आले आणि तलाठ्यांच्या कारवाईला विरोध केला. आम्ही पोलीस ठाणे, तहसीलदार, जिल्हाधकाऱ्यांना हप्ता देतो त्यामुळे आमच्यावर कारवाई करता येणार नाही. आम्ही वीस लाखांचे हप्ते देतो, तुम्ही आमची वाहने पकडताच कशी, असा दम देऊन तस्कर तलाठ्यांसमोरुन वाहने घेऊन गेले. मी स्वतः तहसीलदार, प्रांत आणि जिल्हाधिकाऱ्यांबरोबर बोललो.
कोणतीच कारवाई होत नव्हती.’ या प्रकरणात कारवाई झालेल्या तलाठ्यांचा दोष किती, तहसीलदार आणि तस्करांवर कारवाई का नाही, या प्रकरणाची एसआयटी नेमून चौकशी होणार का, असे प्रश्न आ. गोरे यांनी विचारले. लक्षवेधीवर उत्तर देताना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, “पेन ड्राईव्ह संभाषणात तस्कर बोलत आहेत. त्यामुळे त्याचा अभ्यास करुन कारवाई करु. चौकशीसाठी विभागीय आयुक्तांची नेमणूक केली जाईल. तहसीलदारांच्या विरोधात पुरावे असतील तर त्यांच्यावर तसेच वाळू तस्करांवर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.