पुणे (व्यंकटेश भोळा/ संदीप घोडके) –पुण्यातील शासकीय “आरे’ दुधाचे वितरण 3 मार्चपासून बंद करण्यात आले आहे. शासकीय दूध योजनेचे “आरे’ दूध पुरवठा पुण्यात तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय दुग्ध विकास विभागाने घेतला आहे. त्यामुळे आरेचा दूध पुरवठा पूर्ववत होणार असल्याची सांशकता असून, ही शासकीय योजना बंद होण्याच्या मार्गावर आहे. कमी दरात आणि चांगल्या गुणवत्तेची मिळत असलेले आरेचे दूध मिळणार नसल्याने ग्राहक त्रस्त आहेत.
खासगी दुधाच्या तुलनेत शासकीय आरेची आजही मागणी कायम आहे. मात्र, गेल्या वीस दिवसांपासून शहरातील आरे दूध केंद्र चालकांना दुधाचा पुरवठा होत नसल्याची तक्रार आरे दूध केंद्र चालकांनी केली. त्यामुळे नेहमीचे ग्राहक असलेले या दुधापासून वंचित राहावे लागत आहे. आरेचे मुळात पुण्यात शेतकऱ्यांकडून दूध संकलन होत नाहीत.
हा सर्व दूधपुरवठा औरंगाबाद विभागाकडून होत असून, त्यातूनच पुण्यात दूधपुरवठा होत आहे. वाकडेवाडी येथे असलेल्या शासकीय दूध योजनेच्या माध्यमातून दुधाचे पॅकिंगची व्यवस्था कात्रज डेअरी विभागकडून होत होती. त्यानंतर त्याचा पुरवठा होत होता. आता मात्र दूधाचा तुटवडा निर्माण झाल्याने दुधपुरवठा बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला. शहरातील मोठ्या शासकीय रुग्णालय, आश्रमशाळा, वसतिगृह यांना आरेची दूध पुरवठा नियमित केली जाते. मात्र आता या कार्यालयांना दि. 15 मार्चपासून दूध वितरण व्यवस्था बंद केली आहे. त्यामुळे प्रादेशिक मनोरुग्णालय, ससून यासारख्या मोठ्या शासकीय विभागांना मोठा फटका बसला आहे. दरम्यान, दुधाचा तुटवडा निर्माण झाल्याने आणि पुण्यात दूधसंकलन नसल्याने औरंगाबाद विभागाकडून येणारा दूधपुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे तूर्तास पुण्यातील आरेची दूध वितरण व्यवस्था बंद करण्यात आली आहे. याबाबत दुग्ध विकास विभागाकडे शासकीय आरे दूध पुन्हा दूध पुरवठा सुरू करण्याचा पत्रव्यवहार केला आहे. याबाबत शासनाकडूनच निर्णय होणे अपेक्षित आहे, असे प्रभारी व्यवस्थापक विवेक माने यांनी सांगितले.