मुंबई – देशभरात सध्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची चर्चा रंगताना दिसत आहे. 11 मार्च रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई करत आहे. चित्रपटामधील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत असून, सर्वच स्तरातून त्यांचे आणि चित्रपटाचे कौतुक होत आहे.
दरम्यान, ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटात मराठी अभिनेता ‘चिन्मय मांडलेकर’ याने साकारलेल्या फारुख मलिक उर्फ बिट्टाची भूमिका सर्वांचेच लक्ष वेधून घेणारी आहे. तर या भूमिकेला योग्य न्याय दिल्यामुळे सर्वजण चिन्मयचे विशेष कौतुक करत आहे. पण एका मुलाखतीदरम्यान चिन्मयने केलेल्या त्या कृतीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. या संदर्भातील एक व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
द कश्मीर फाइल्स या चित्रपटात बिट्टाची भूमिका साकारणारा अभिनेता चिन्मय मांडलेकर नुकतंच एका वाहिनीला मुलाखत दिली. त्यावेळी त्या वाहिनीच्या मुलाखत घेणाऱ्या अँकरने चिन्मयबाबत परिचय देण्यास सुरुवात केली. यावेळी त्या अँकरने “छत्रपती शिवाजी महाराज’ यांचा उल्लेख “शिवाजी…’ असा केला. यावर चिन्मयने त्याला थांबवत “छत्रपती शिवाजी महाराज’ असा उल्लेख करावा असे फार प्रेमळ शब्दात सांगितले.
View this post on Instagram
त्यावेळी त्याचे महाराजांबद्दल असलेले प्रेम पाहून चाहते भारावून गेले आहेत. चिन्मयचा हा व्हिडिओ लेखक, दिग्दर्शक, अभिनेता दिग्पाल लांजेकर यानेही त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. त्यासोबत त्याने एक पोस्ट लिहत चिन्मयचे विशेष कौतुकही केले आहे.
“निव्वळ अभिमान…निव्वळ अभिमान.. मित्रा चिन्मय, माझ्या माहितीतला सर्वोत्कृष्ट अभिनेता, माझा जवळचा मित्र, माझा भाऊ म्हणून तुझा अभिमान होताच.. परंतु, आजच्या या कृतीने यशाच्या वेगळ्या शिखरावर असताना सुद्धा तू आपल्या दैवताला विसरला नाहीयेस हे पाहून अभिमानाने ऊर भरून आला.
छत्रपती शिवाजी महाराज तुझ्या पदरात अशाच प्रकारच्या यशाच्या ओंजळीचा कृपाप्रसाद घालत राहोत ही त्यांच्या चरणी प्रार्थना.. जय शिवराय…हर हर महादेव..” या आशयाची पोस्ट दिग्पाल लांजेकरने शेअर केली आहे.