कोची – नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात आयोजित करण्यात आलेल्या निदर्शनांमध्ये भाग घेतल्याबद्दल नॉर्वेच्या एका महिला प्रवाशाची भारतातून हकालपट्टी करण्यात आली आहे. व्हीसा नियमांचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून तिच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येते. तिने 23 डिसेंबर रोजी केरळात झालेल्या आंदोलनात भाग घेतला होता.
सोशल मिडीयाद्वारे ही बाब जाहीर झाल्यानंतर गृहमंत्रालयाने या प्रकरणाची चौकशी करून तिच्या हकालपट्टीचा निर्णय घेतला. जेनी मेट्टे जोहान्सन असे या महिलेचे नाव असून तिने आपल्या फेसबुक पोस्टवर म्हटले आहे की भारत सरकारचे अधिकारी माझ्या हॉटेलवर आले आणि त्यांनी मला देश सोडून जाण्यास सांगितले. त्वरीत देश सोडून न गेल्यास कायदेशीर कारवाई करण्याचाहीं इशारा या अधिकाऱ्यांनी आपल्याला दिल्याचे तिचे म्हणणे आहे.
आपण मित्रांच्या मदतीने दुबईच्या विमानाचे तिकीट बुक करीत असून तेथून आपण स्वीडनला जाऊ असे तिने म्हटले आहे. सदर महिला पर्यटक व्हिसावर भारतात आली होती. आपण लोकांनी काढलेल्या मोर्चात सहभागी झालो होते असे तिने या फेसबुक पोस्टवर मान्य केले आहे.