सेऊल (दक्षिण कोरिया) – देशाच्या अर्थकारणामध्ये बहुतेक सर्वच क्षेत्रात चूका झाल्याचे उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांनी स्पष्ट शब्दात कबूल केले आहे. उत्तर कोरियातील सत्तारुढ “वर्कर्स पार्टी’च्या अधिवेशनामध्ये त्यांनी ही कबूली दिली आहे. उत्तर कोरियाच्या सरकारी वृत्तसंस्थेने बुधवारी याबाबतचे वृत्त दिले आहे.
गेल्या वर्षभरात देशाची आर्थिक प्रगती अपेक्षेपेक्षा खूपच कमी झाली आहे. आर्थिक विकासाचे निश्चित केलेले धोरणच नंतरच्या काळात सोडून द्यायला लागले. यातून मिळालेला धडा, अनुभव आणि झालेल्या चुका यावर सखोल विचार व्हायला पाहिजे, असे किम यांनी अधिवेशनाच्या उद्घाटनाच्या सत्रात आर्थिक आढावा घेताना सांगितले.
उत्तर कोरियातील सत्तारुढ पक्षाचे अधिवेशन गेल्या पाच वर्षात प्रथमच होत आहे. उत्तर कोरियाच्या राजकीय इतिहासात असे अधिवेशन केवळ आठ वेळा झाले आहे. अमेरिकेमध्ये नियोजित अध्यक्ष ज्यो बायडेन हे अध्यक्षपद स्वीकारण्याच्या काही आठवडे आगोदर हे अधिवेशन होत आहे.
उत्तर कोरियावर लादलेले निर्बंध आणि त्यावरून उत्तर कोरियाने दिलेल्या प्रतिक्रीयेच्या मुद्दयावरून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि किम जोंग उन यांच्यातील संबंध ताणले गेले होते. त्याचबरोबर चीनमधून होणारा करोना विषाणूचा संभाव्य संसर्ग रोखण्यासाठी उत्तर कोरियाने गेल्या वर्षी जानेवारीमध्ये आपल्या सीमा बंद केल्या आहेत. त्यामुळेही उत्तर कोरियावर एकाकी पडण्याची वेळ आली आहे.
वर्कर्स पार्टीचे अधिवेशन उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयोंग इथे मंगळवारपासून सुरू झाले. या अधिवेशनाला सत्तारुढ पक्षाचे 7 हजार प्रतिनिधी उपस्थित आहेत, असे सत्तारुढ पक्षाच्या वर्तमानपत्रात म्हटले आहे. उपस्थित असलेल्यांपैकी कोणीही मास्क घातलेला नाही, हे प्रसिद्ध झालेल्या फोटोंवरून लक्षात येते.