डेहराडून – उत्तराखंड विधीमंडळातील कॉंग्रेसच्या नेत्या इंदिरा ह्दयेश यांच्या विषयी प्रदेश भाजप अध्यक्षांनी अत्यंत अवमानकारक उद्गार काढले होते, त्या बद्दल प्रदेश भाजप अध्यक्षांच्यावतीने राज्याचे मुख्यमंत्री त्रिदेवसिंह रावत यांनी त्यांची जाहीर माफी मागितली आहे.
उत्तराखंड प्रदेश भाजपचे अध्यक्ष बन्सीधर भगत यांनी विरोधी पक्ष नेत्या इंदिरा यांचा उल्लेख बुढिया असा केला होता. त्या अनुषंगाने त्यांची माफी मागताना मुख्यमंत्री रावत यांनी म्हटले आहे की, आम्ही महिलांचा सन्मान करतो. तुमचा जो अवमान झाला आहे त्याबद्दल मी स्वता तुमची माफी मागतो.
बहेनजी आम्हाला माफ करा असा ट्विटर संदेश त्यांनी जारी केला आहे. मी स्वता त्यांच्याशी संपर्क साधून त्यांची माफी मागणार आहे असेही मुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे.
तथापि प्रदेशाध्यक्ष भगत यांनी मात्र त्यांची माफी मागण्यास नकार दिला असून आपले वक्तव्य मागे घेण्यासही त्यांनी नकार दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनीच त्यांची माफी मागून या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. भगत यांच्या या विधानाच्या संबंधात कॉंग्रेस नेत्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नढ्ढा आणि पंतप्रधान मोदींकडे तक्रारी केल्या आहेत.
भगत हे एकेठिकाणी पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले होती विरोधी पक्ष नेत्या इंदिरा ह्दयेश यांनी अनेक भाजप आमदार आपल्या संपर्कात आहेत असे म्हटले आहे, त्यांच्या सारख्या म्हाताऱ्या बाईच्या संपर्कात कोणता पुरूष राहील असा सवाल करीत भगत यांनी त्यांच्या विषयी अनुद्गार काढले होते. आणि विशेष म्हणजे स्वता भगत यांनी आपले हे विधान फेसबुकवरही प्रसारीत केले होते.