पुणे -जमिनीची मालकी हक्क गृहसंस्थेला प्रदान करणारी मानीव अभिहस्तांतरण (डीम्ड कन्व्हेअन्स) प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली आहे. गृहनिर्माण संस्थेकडून भोगवटा प्रमाणपत्राऐवजी इमारतीचा प्रत्यक्ष ताबा घेतल्याचे तसेच इमारतीसंदर्भात असलेली सर्व दायित्वे स्वीकारण्यास तयार असल्याचे स्व-प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. या सुविधेमुळे भोगवटा प्रमाणपत्र नसेल, तरीही मानीव अभिहस्तांतरण होणार आहे.
राज्यात सुमारे दोन लाख सहकारी संस्था आहेत. त्यापैकी 1 लाख 5 हजार गृहनिर्माण सोसायट्या आहेत. पुणे शहर व पिंपरी-चिंचवड मध्ये मिळून सुमारे अठरा हजारांहून अधिक गृहनिर्माण सोसायट्या आहेत. त्यापैकी काहीच संस्थांचे मानीव अभिहस्तांतरण झाले आहे. काही सोसायट्या या वीस वर्षांपेक्षा अधिक जुन्या आहेत. काही सोसायट्यांचे मानीव अभिहस्तांतरण झाले नाही, अशांना जमिनीची मालकी स्वत:च्या नावावर करून देण्यासाठी सहकार विभागाने मानीव अभिहस्तांत्रणाची विशेष मोहीम घेतली आहे. मात्र, आवश्यक कागदपत्रे मिळत नसल्याने तसेच सहकारी संस्थांची उदासिनता यामुळेही प्रक्रियेस अपेक्षित यश आलेले नाही.
डीम्ड कन्व्हेअन्स करण्यासाठीचे टप्पे
संबंधित जिल्हा उपनिबंधक यांच्या कार्यालयाकडे विहित नमुना-7 मध्ये आवश्यक कागदपत्रांसह कन्व्हेअन्सच्या मसुदा दस्तासह सादर करत अर्ज करणे. तसेच डीम्ड कन्व्हेअन्सचा आदेश व प्रमाणपत्र दस्तासहित प्राप्त करून घेणे.
मसुद्यात सर्व सदनिकाधारकांच्या मुद्रांक शुल्काच्या तपशीलासह मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्याकडून अभिनिर्णय करून घेणे.
अभिनिर्णयाच्या आदेशानंतर सदर दस्त संबंधित कार्यक्षेत्रातील दुय्यम निबंधक (खरेदी- विक्री) यांच्या कार्यालयात नोंदणीकृत करून घेणे.
नोंदणीकृत दस्तनुसार संबधित नगर भूमापन अधिकारी यांच्याकडे अथवा मंडल अधिकारी यांच्याकडे सात-बारा उताऱ्यावर नोंदणीसाठी अर्ज करणे. – संबंधित अधिकारी यांनी प्रॉपर्टी कार्ड अथवा सात-बारा उताऱ्यावर भोगवटादार म्हणून संस्थेचे नाव नोंदविल्यानंतर मानीव अभिहस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
डीम्ड कनव्हेन्स करणे का आवश्यक
सहकारी गृहनिर्माण संस्थेस जमिनीचा मालकी हक्क मिळतो
पुनर्विकास होण्याकरीता सर्व फायदे संस्थेला व संस्थेतील सभासदांना प्राप्त होण्यासाठी
उर्वरित किंवा भविष्यात प्राप्त होणारा एफएसआय अथवा टीडीआर बाबतचे लाभ व मालकी हक्क गृहनिर्माण संस्थांना मिळण्यासाठी