सावली फाउंडेशन, अभिजीत आर्टसचा उपक्रम
हडपसर – करोना, लॉकडाऊन, सोशल डिस्टन्सिंग या सर्वांचे सावट यंदाच्या गणेशोत्सवावर आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला असताना घरोघरी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. मूर्तीसह उत्सवासाठीचे साहित्य उपलब्ध करण्याचा प्रश्न नागरिकांना पडलेला असताना यावर उपाय म्हणून सावली फाउंडेशन व अभिजीत आर्टसच्या वतीने “बाप्पा आपल्या घरी’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे.
या उपक्रमात गणेशमूर्ती एका वाहनावर व्यवस्था केलेल्या स्टॅंडवर मांडून हे वाहन परिसरातील सोसायट्या, कॉलनी व वस्त्यांवर तेथील नागरिकांची वेळ घेऊन उभे केले जाईल. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून त्यांना मूर्ती दाखविल्या जातील. आवडती मूर्ती नागरिक बुकिंग करतील. त्यानंतर गणेशोत्सवाच्या दोन-तीन दिवस अगोदर बुकिंग केलेली मूर्ती थेट संबंधित नागरिकाच्या घरी पोहोच केली जाणार आहे.
गर्दीच्या ठिकाणी जाणे नागरिकांनी टाळले पाहिजे. यावर उपाय म्हणून ही संकल्पना राबविण्यात येणार असल्याचे अभिजीत आर्टसचे सुरेश आबनावे व नगरसेवक योगेश ससाणे यांनी सांगितले.