तालुक्यातील निसर्ग सौंदर्याची पर्यटकांना भुरळ
सचिन केदारी
पौड – मुळशी तालुका हा पुणे शहराच्या पश्चिमेला येतो. मुळशी तालुक्याची हद्द पूर्वेला पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्याशी, दक्षिणेला वेल्हे, उत्तरेला मावळ तालुक्याशी आणि पश्चिमेला रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्याशी भिडलेली आहे.
तालुक्याच्या पश्चिमेला असलेला सह्याद्री पर्वताचा डोंगराळ भाग. सह्याद्री पर्वताचे पश्चिमेकडे कोंकणात उतरणारे कडे खास आहेत. त्यामानाने पूर्वेकडे मात्र इतक्या तीव्र चढणीचे कडे आढळत नाहीत. मुळशी तालुक्यातील सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून दोन उपरांगा पूर्वेकडे पसरल्या आहेत. ह्या उपरांगांमुळे मुळा आणि निळा ह्या दोन नद्यांची खोरी निर्माण झाली आहेत. मुळशी तालुका हा मुळशी धरणाच्या सभोवताली घनगड, तेलबैला, कोराईगड, कैलास गड, तिकोना असे किल्ले असलेला तालुका याच तालुक्यात प्रसिद्ध असलेला पळसे येथील धबधबा, आदरवडी ताम्हिणी येथील विंझाई देवी मंदिर, कुंडलिका व्हॅली, प्लस व्हॅली, अंधरबंद, ताम्हिणी वन्यजीव अभयारण्य असे पर्यटकांना आकर्षण आसणारी अनेक ठिकाणं आहेत.
निसर्गसंपन्न अशा मुळशी तालुक्यात अनेक पर्यटन स्थळ विकसित होऊ शकतात. ताम्हिणी घाटाच्या सभोवताली मोठे धबधबे असून या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात. या तालुक्यात निसर्गरम्य वातावरणात शुद्ध हवा असलेली हिरवीगार झाडी, डोंगर, पावसाळ्यात वाहणारे असंख्य असे धबधबे, यामधील असलेली शांतता आणि अप्रतिम असे निसर्ग सौंदर्य असलेली ठिकाणे पुण्यापासून काही अंतरावर असलेली ही ठिकाणे पर्यकांसाठी एक पर्वणीच ठरणार आहेत.
पर्यटकांचे लक्ष केंद्रित करण्यासाठी मुळशी पंचायत समितीमार्फत मुळशी तालुका पर्यटन तालुका होण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे, अशी सुंदर ठिकाणे ही पर्यटकांचे आकर्षण आहेत. परंतु पर्यटनाच्यादृष्टीने आजही विकासापासून वंचित आहे. यापुढे ही ठिकाणे पर्यटनाची ठिकाणे प्रसिद्ध व्हावी, यामुळे स्थानिक भूमी पुत्रांना व्यवसाय नोकरी निर्माण होण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. यासाठी काही दिवसापूर्वी गट विकास अधिकारी संदीप जठार आणि मुळशी तालुक्यातील सर्व पत्रकार यांनी एकत्र येऊन पर्यटनस्थळांची पाहणी केली.
खासदार सुळे यांनाही निसर्गाची मोहिनी
नुकत्याच झालेल्या मुळशी तालुका दौऱ्यात असताना प्रवासादरम्यान निसर्गाने परिपूर्ण असलेल्या मुळशी तालुक्याच्या सौंदर्याने खासदार सुप्रिया सुळे यांना भुरळ पाडली. या दौऱ्यादरम्यान अनेक भागात गाडीतून उतरून त्यांनी निसर्गाचा अनुभव घेतला. अनेक ठिकाणी त्यांना स्वतः आपल्या मोबाईलमध्ये काही फोटो आणि व्हिडीओ घेण्याचाही मोह आवरता आला नाही.