11 रस्त्यांवर धडाकेबाज कारवाई : बेकायदेशीर स्टॉल्स आणि साहित्य जप्त
पुणे – शहरात “नो हॉकर्स झोन’ जाहीर केलेल्या 11 रस्त्यांवर महापालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण विभागाने धडाकेबाज कारवाईला सुरुवात केली आहे. महापालिका आणि पोलीस प्रशासनाने एकत्रित कारवाई सुरू केली असून, बेकायदेशीर स्टॉल्स आणि साहित्याची जप्तीही सुरू केली आहे.
महापालिकेचा अतिक्रमण विभाग आणि वाहतूक पोलीस प्रशासनाने गेल्या पंधरा दिवसांत 4 हजार अतिक्रमणांवर कारवाई केली आहे. यात स्टॉल, हातगाडी, पथारी, सिलेंडर आणि इतर साहित्य जप्त केले. दरम्यान, अतिक्रमणांना आळा घालण्यासाठी आता रात्रीच्या वेळीही कारवाई होणार आहे.
शहरातील विविध रस्त्यांवर आणि पदपथांवर लहान मोठ्या व्यावसायिकांनी बेकायदेशीरपणे व्यवसाय थाटले आहेत. यामुळे पादचाऱ्यांना आणि वाहनचालकांना कोंडीचा सामना करावा लागतो. दिवसेंदिवस बेकायदेशीरपणे व्यवसाय करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे अतिक्रमण निर्मूलन विभागाने मोकळ्या जागा आणि कमी रहदारीच्या रस्त्यांवर पथारी व्यावसायिकांसाठी फुड झोन तयार केले आहेत.
या झोनमध्ये परवानाधारक व्यावयासिकांचे स्थलांतर करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी स्थलांतर करण्यातही आले आहे. असे असतानाही अनेक व्यावसायिक फूड झोन सोडून जुन्या ठिकाणी व्यवसाय करत आहे.
शहरातील काही भागांत रात्रीच्यावेळी हातगाड्या लावून चायनीज, अंडाभुर्जी, वडापाव, सॅन्डवीच, कच्छी दाबेली, भाजी, फळे विक्रीचे व्यवसाय केले जात आहेत. त्यामुळे प्रशासनाने आता रात्रीच्यावेळीही कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, महापालिका प्रशासनाने शहरातील सोलापूर रस्ता, नगर रस्ता, सिंहगड रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, सातारा रस्ता, गोखले (फर्गसन) रस्ता, जंगली महाराज रस्ता, गणेशखिंड रस्ता, गणेशखिंड ते रेंजहिल्स व्हीआयपी रस्ता, गुंजन चौक ते लोहगांव विमानतळ-व्हीआयपी रस्ता या 11 रस्त्यांना “नो हॉकर्स झोन’ म्हणून जाहीर केले आहे. या अनुषंगाने अतिक्रमण विभाग आणि वाहतूक पोलीस प्रशासनाने या 11 रस्त्यांवरील अतिक्रमणांवर आपले लक्ष केंद्रित करून कारवाई मोहीम हाती घेतल्याचे अतिक्रमण नियंत्रण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी सांगितले.
खासगी बसवरही होणार कारवाई
शहराच्या विविध भागांत रस्त्याच्या कडेला रात्री आणि दिवसा खासगी बस उभ्या केल्या जातात. या बसमुळे रात्रीच्या वेळी विविध रस्त्यांवर वाहतूक कोंडी होते. बसच्या प्रतिक्षा रांगेत उभ्या राहिलेल्या प्रवाशांना या खासगी बसेसचा अडथळा होतो. त्यामुळे त्यावर पोलिसांच्या मदतीने कारवाई करण्यात येणार असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले.
30 दुकानांना सील
13 जानेवारी ते 03 फेब्रुवारी या 15 दिवसांमध्ये तब्बल 4 हजार 125 अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये 32 स्टॉल, 459 हातगाडी, 1694 पथारी व्यावसायिक, 70 सिलेंडर, 484 शेड, 22 व्यावसायिक वाहने आणि इतर 1,334 वस्तूंवर जप्तीची कारवाई केली आहे. या कारवाईत 30 दुकानांना सीलही ठोकण्यात आले आहे.