ना भीती, ना गांभीर्य बाजारपेठ गजबजली 

जामखेड – जामखेड शहर करोनमुक्‍त झाल्याने प्रशासनाने नागरिकांच्या सोयीसाठी सर्व दुकाने सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मुभा दिली. परंतु त्यासाठी वार आणि वेळ निश्‍चित केले. छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.शिवाय कुठेही गर्दी किंवा योग्य फिजिकल डिस्टिन्सिंग नियमांचा भंग होत असल्यास अशी दुकाने सक्षम प्राधिकाऱ्यांनी तत्काळ बंद करण्याचेही आदेश दिले.

मात्र, याला न जुमानता हजारो नागरिकांनी खरेदीसाठी बाजारात गर्दी करत असून जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या 152 वर गेली असताना सुद्धा काही नागरिक बेफिकीर असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. बहुतांश दुकाने उघडी, लोकांचा मुक्त वावर सुरू झाल्यानंतर संसर्गाचे प्रमाण नियंत्रणात आणण्याची प्रशासकीय यंत्रणेवरील जबाबदारी कैकपटीने वाढली आहे.

शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या मेन पेठ, खर्डा चौक, जयहिंद चौक, बीड कॉर्नर, बीड रोड, बाजारतळ, शनिमंदिर परिसर आदी भागात रस्त्यावर दुपारपर्यंत प्रचंड गर्दी होत आहे. दुतर्फा वाहने पार्किंग केल्यामुळे रस्ता अरुंद झाला. परिणामी वाहतूक कोंडी होऊन फिजिकल डिस्टन्सिंगला जणू हरताळ फासला गेला. काही दुकानांसमोर मार्किंग करून घेतले. तसेच काहींनी लाकडी बांबू लावून बॅरिकेट्‌स तर काहींनी दोरी बांधून फिजिकल डिस्टन्सिंग राखण्यासंदर्भात उपाययोजना केल्या.

परंतु बहुतांशी छोट्या व्यापाऱ्यांनी प्रशासनाने सूचवलेल्या कोणत्याही अटी व शर्थींचे पालन केले नाही. उलटपक्षी छोट-छोटे विक्रेते, दुकानदार सर्रास ग्राहकांचा थेट सामना करत होते. काहीही होत नाही, या मानसिकतेतून जनतेने दाखवलेला निष्काळजीपणा व प्रशासनाने दिलेली ढिलाई यामुळेच करोनाने पुन्हा तालुक्‍यात डोके वर काढले, अशी भीती व्यक्त होत आहे.

मास्क वापरण्यासह सॅनिटाझरचा वापर वगैरे गोटी अक्षरक्षः दुर्लंक्षित होत होत्या. काही वाहन चालकांसह पादचाऱ्यांनी तोंडाला मास्क बांधले असले तरी वाहतूक कोंडीमुळे त्यांचा एकमेकांना स्पर्श झाला.हेच चित्र दुकानांमध्ये सुद्धा पाहावयास मिळाले. या गर्दीतून बाहेर पडण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत होते. मात्र, सर्वांनाच गर्दी नको असल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर भीतीसुद्धा होती. यातच दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहने रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी उभी असल्यामुळे बाजारातून बाहेर निघण्यासाठी जागा मिळेल तेथून पादचाऱ्यांसह वाहनचालक प्रयत्न करताना दिसले.

जामखेड नगरपरिषदेच्या वतीने फिजिकल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. मात्र या कारवाईत सत्यात ठेवणे आवश्‍यक आहे तरच गर्दीला होणाऱ्या दुकानदारानांवर कारवाईचा धाक बसेल मात्र, सर्व काही निव्वळ प्रशासनाच्या हवाली केल्यास स्थिती नियंत्रणात येणे अशक्‍य कोटीतील गोष्ट होईल. त्यामुळे नागरिकांनीही सर्व खबरदारी घेण्याची जबाबदारी उचलणे अत्यावश्‍यक आहे. प्रशासन व नागरिक अशा दोन्ही बाजूने गांभीर्याने लढा दिला तरच करोना संकटावर मात करणे आवाक्‍यातील गोष्ट होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.