रांजणगावातील उजनी उपसा सिंचन योजना कार्यान्वित करा ः आ. काळे 

कोपरगाव -तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने वरदान ठरलेली रांजणगाव देशमुख उजनी चारी उपसा जलसिंचन योजनेकडे 2014 पासून दुर्लक्ष झाल्यामुळे ही योजना बंद पडली. आ. आशुतोष काळे यांनी ही योजना पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी संगमनेर ऊर्ध्व प्रवरा कालवा व गोदावरी जलविद्युत उपसा जलसिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत नुकतीच बैठक घेतली. तसेच ही योजना सुरू करण्याच्या सूचना केल्या.

उजनी चारीसाठी ओव्हर-फ्लोचे पाणी आरक्षित असूनही मागील वर्षीच्या पावसाळ्यात दोनदा जायकवाडी धरणात ओव्हर-फ्लो पाणी सोडले. मात्र उजनी चारी कोरडी राहून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. याची दखल घेवून आ. काळे यांनी घेतलेल्या बैठकीत या योजनेची सद्यस्थिती जाणून घेत उजनी चारीवरील सात पाझर तलाव भरण्याविषयी येणाऱ्या अडचणींवर अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली.

त्याचबरोबर पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील लिफ्टच्या नादुरुस्त विद्युत मोटारी दुरुस्ती करून घ्याव्या. नादुरुस्त जलवाहिन्यांची तातडीने दुरुस्ती करून घ्यावी. ज्या ठिकाणी चाऱ्यांची कामे झालेली नाहीत, त्याठिकाणी लवकरात लवकर चाऱ्या तयार करून घ्याव्या. सध्या उजनी चारीच्या लाभक्षेत्रातील शेतात पिके नसल्यामुळे सर्व दुरुस्तीची कामे करण्यासाठी अडचणी येणार नाहीत. त्यामुळे सर्वच प्रकारच्या दुरुस्तीची कामे पावसाळ्याच्या आत पूर्ण करून घ्यावीत. योग्य त्या उपाय योजना करून सर्व पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरून घ्यावेत, अशा सूचना दिल्या. दुरुस्तीसाठी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून हवी ती मदत देण्याचे आश्‍वासनही दिले.

आ. काळे यांनी बंद पडलेल्या रांजणगाव देशमुख उजनी चारी उपसा जलसिंचन योजनेला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी पाऊल उचलल्यामुळे रांजणगाव देशमुख, धोंडेवाडी, वेस, सोयेगाव, मनेगाव, बहादरपूर, अंजनापूर आदी गावातील लाभधारक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी उजनी उपसा सिंचन योजनेचे रांजणगाव देशमुखचे अध्यक्ष बाबूराव थोरात, अंजनापूरचे माजी सरपंच ज्ञानेश्वर गव्हाणे, कार्यकारी अभियंता गिरीश संघानी, उपविभागीय अभियंता विवेक लव्हाटे, उपअभियंता डी. एस. ढिकले, शाखा अभियंता बाळासाहेब फुलफगर आदी सोशल डिस्टन्सिंग पाळून उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.