पुणे – योनो प्लॅटफॉर्मवरून कर्ज उपलब्ध करण्याची कसलीही योजना स्टेट बॅंक ऑफ इंडियाने सुरू केलेले नाही, असे स्पष्टीकरण बॅंकेतर्फे देण्यात आले. यासंबंधात समाज माध्यमावर काही अफवा पसरल्या आहेत. ग्राहकांनी त्यावर विश्वास ठेवू नये, असे बॅंकेने म्हटले आहे.
समाज माध्यमावर व्हायरल होणाऱ्या मेसेजमध्ये स्टेट बॅंकेने योनो प्लॅटफॉर्मवरून 45 मिनिटांत तातडीचे 5 लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध केले आहे. त्याला व्याजदर 10.5 टक्के असणार आहे. त्याचबरोबर पहिले 6 महिने या कर्जावर व्याजदर लागणार नाही, असे म्हटले आहे.
या समाज माध्यमावरील माहितीमध्ये कसलेही तथ्य नसल्याचे बॅंकेने म्हटले आहे. एकूण सध्या ग्राहकांनी सावध राहून व्यवहार करण्याची गरज आहे. कसल्याही अफवांवर विश्वास न ठेवता बॅंकेशी संपर्क साधून स्पष्टीकरण मागण्याची गरज असल्याचे स्टेट बॅंकेने म्हटले आहे.