पौडमधील दुर्दैवी घटना : मृत रुग्णावर मुलांनीच केले अंत्यसंस्कार
पिरंगुट (वार्ताहर) – खासगी रूग्णालयाकडून झालेली लुटमार, करोना रूग्णाची दिशाभूल, ना करोना पॉझिटिव्हचा दाखला, ना सरकारी मदत, अशा भयानक परिस्थितीत पुण्याजवळील पौड येथील एका गरीब करोना मृत रूग्णावर मुलांनाच अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी घटना मुळशी तालुक्यात घडली आहे.
पौड (ता. मुळशी) येथील एक निवृत्त सरकारी कर्मचारी अंग दुखत असल्याने त्यांना शुक्रवारी (दि. 10) एका हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्यावेळी त्यांची कोव्हिडची चाचणी करणे गरजेचे असताना चाचणी न करताच हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले. तेव्हा रात्री रुग्णाला घाम येत आहे म्हणून आयसीयूमध्ये दाखल केले व त्यांना न्यूमोनियासारखी कारणे देत त्यांच्यावर शुक्रवार (दि. 10) ते गुरुवार (दि. 16) पर्यंत उपचार सुरूच होते. मात्र, गुरुवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला.
मृत्यूनंतरही त्यांचा अहवाल न आल्याने करोना पॉझिटिव्ह असलेला हा मृतदेह पहाटे 4 ते दुपारी 2 वाजेपर्यंत हॉस्पिटलमध्ये तसाच पडून होता. दरम्यानच्या काळात रूग्णाच्या मुलांकडून हॉस्पिटलने 80 हजारांचे बील देखील वसूल केले होते. याशिवाय चाचण्या व औषधासाठी 40 हजार खर्च झाले होते. शेवटी अडीच वाजण्याच्या सुमारास अहवाल करोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती डॉक्टरांनी सांगितली. दरम्यान, मृत व्यक्तींच्या मुलांनी मुळशीतील आरोग्य विभागाला याबाबत फोन करूनही त्यांच्याकडून काहीच उत्तर मिळत नव्हते.
एकीकडे हॉस्पिटलचे डॉक्टर मृतांना अंत्यविधीसाठी घाई करीत होते तर दुसरीकडे मृत रूग्णाची मुले व काही मित्र रुग्णवाहिका शोधत होते. सरकारी रुग्णवाहिकाही आली नाही. अखेर तीन हजार रूपये देऊन एक खासगी रूग्णवाहिका घेण्यात आली व त्या रुग्णाच्या मुलांनीच पैसे देऊन एक पीपीई कीट घेऊन अंगावर चढवले व तो मृतदेह घेऊन पौड गावी गेले. तोपर्यंत गावातील लोकांनी पौड स्मशानभूमीत अंत्यविधीची तयारी करून ठेवली होती. तेव्हा या दोघा मुलांनी आपल्या वडिलांचा देह कसाबसा सरणावर ठेवला व त्यांना शेवटचा निरोप दिला.