खासगी लॅबचालकांच्या बैठकीत महापालिका अतिरिक्त आयुक्तांची तंबी
खासगी लॅबकडून हलगर्जीपणा होत असल्याची स्थिती
पुणे – नागरिकांच्या स्वॅब तपासणीची तसेच करोना पॉझिटिव्ह-निगेटिव्ह व्यक्तींची माहिती 24 तासांच्या आत पालिकेला न दिल्यास कडक कारवाई करू, असा इशारा महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सोमवारी दिला. तर खासगी लॅबमध्ये होणाऱ्या तपासण्यांपैकी पॉझिटिव्ह निदानाची टक्केवारी पालिकेच्या टक्केवारीच्या दुप्पट कशी, याचाही खुलासा करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले.
शहरातील सहा लॅबमध्ये करोनाची स्वॅब तपासणी केली जाते. परंतु, अहवाल आणि संबंधित माहिती वेळेत दिली जात नसल्याने आकड्यांमध्ये गोंधळ निर्माण होत आहे. तसेच लॅब चालकांकडून पालिकेला दाद दिली जात नाही. यामागील “नेमकी’ कारणेही समजत नव्हती. सोमवारी या खासगी लॅबचालकांची बैठक अग्रवाल यांनी बोलावली होती. त्यावेळी अग्रवाल यांनी लॅबचालकांना फैलावरच घेतले.
करोना निगेटिव्ह अथवा पॉझिटिव्ह व्यक्तींची माहिती त्याच दिवशी किंवा 24 तासांच्या आत पालिकेला कळविणे बंधनकारक आहे. परंतु, खासगी लॅब ही माहिती वेळेत देत नाहीत. खासगी लॅबकडून याबाबत हलगर्जीपणा केला जात असल्याचे आणि पालिकेच्या आदेश आणि सूचनांना गांभीर्याने घेतले जात नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पालिकेने या सर्व खासगी लॅबला नोटीस बजावण्याचा निर्णय घेतला आहे. 9ेया लॅबकडून उशिरा माहिती देणे, पॉझिटिव्ह व्यक्तींची माहिती उशिरा देणे, पॉझिटिव्ह निदानाचा दर 40 टक्के असणे यामागील कारणांचा खुलासा मागवण्यात आला आहे. लॅबचालकांसोबत सोमवारी झालेल्या बैठकीत या सर्व विषयांवर चर्चा करण्यात आली.