जामखेड -प्रशासनाने जामखेड शहरासाठी चांगले निर्णय घेतले आहेत. त्यामुळे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे चांगले काम येथे झाले आहे. ज्या ठिकाणी बाधित रुग्ण सापडले आहेत, त्या परिसराच्या बाहेर करोना गेला नाही. आता जामखेडमध्ये एकही करोनाबाधित केस राहणार नाही, अशा उपाययोजना होतील, असे आश्वासन आमदार रोहित पवार यांनी दिले.
आमदार पवार यांनी आज अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच प्रतिबंधात्मक उपायांवर चर्चा केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले, जामखेडमधील 17 पैकी 16 व्यक्तींना सर्दी किंवा अन्य कोणती लक्ष नव्हती. तरीही त्यांना शोधले. 185 जणांची तपासणीही करण्यात आली आहे. त्यापैकी सोळा व्यक्ती करोनाबाधित निघाल्या.
हे रुग्ण शोधण्याचे महत्त्वाचे काम प्रशासनाने केले आहे.करोनाविषयक चाचण्या करण्यात किंवा आरोग्याच्या विषयात आपण कमी पडलो नाहीत. त्यापुढे अजून करोनाबाधित वाढू नये, यासाठी आपला प्रयत्न आहे. शासनाच्या मदतीने येथे आपण अत्यावश्यक सुविधा देणार आहोत. त्याचे प्रमुख तहसीलदार असतील. येथे आता एक सुद्धा केस राहणार नाही, यासाठी आपला प्रयत्न असेल.
शहरातील पहिला रुग्ण तपनेश्वरमध्ये सापडला. त्यानंतर काझी गल्लीत सापडला. त्यानंतर एक ज्येष्ठ व्यक्ती हृदय विकाराच्या आजाराने अंथरुणाला खिळून होती. त्यांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या टेस्ट घेतल्या. त्यात काही व्यक्ती पॉझिटिव्ह होत्या. आतापर्यंत रुग्णसंख्या 17 पर्यंत संख्या पोहली आहे. त्यामुळे आता एकही व्यक्ती बाधित होऊ नये, यासाठी आपला प्रयत्न राहील, असेही आमदार पवार यांनी सांगितले.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर, जिल्हा अरोग्य अधिकारी संदीप सांगळे, प्रांताधिकारी अर्चना नष्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, तहसीलदार विशाल नाईकवाडे, गटविकास अधिकारी पी. पी. कोकणे, पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील, मुख्याधिकारी सुहास जगताप उपस्थित होते.
जामखेड नगरपरिषदेत 165 कर्मचारी काम करत आहेत. त्यात 105 स्वच्छता कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सध्या करोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी हे कर्मचारी शहरात काम करत आहेत. या कर्मचाऱ्यांची नगरपरिषद योग्य ती काळजी घेत आहे. त्यांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी नगरपरिषदेतर्फे सर्व कर्मचाऱ्यांना मास्क, हॅंडग्लोज व सॅनिटायझरचा पुरवठा करण्यात आलेला आहे.
सुहास जगताप , मुख्याधिकारी, नगरपरिषद, जामखेड