नितीश यांच्याविषयीचा लालूंचा दावा बोगस – प्रशांत किशोर

पाटणा -निवडणूक रणनीतीकार आणि जेडीयू नेते प्रशांत किशोर यांच्या मार्फत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी महाआघाडीत परतण्याविषयीचा संदेश पाठवला, असा दावा राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी केला आहे. मात्र, तो दावा बोगस असल्याची प्रतिक्रिया किशोर यांनी दिली आहे.

लवकरच लालूंचे आत्मचरित्र प्रकाशित होणार आहे. त्यामध्ये राजद, कॉंग्रेसचा समावेश असलेल्या बिहारच्या महाआघाडीत परतण्यासाठी जेडीयूचे अध्यक्ष असणाऱ्या नितीश यांनी प्रयत्न केला. लालूंच्या भेटीसाठी त्यांनी दूत म्हणून किशोर यांना पाठवले, असा उल्लेख असल्याचे वृत्त पसरले आहे. मात्र, किशोर यांनी लालूंचा दावा फेटाळून लावला आहे. मी जेडीयूमध्ये प्रवेश करण्याआधी बऱ्याचदा लालूंना भेटलो. त्यावेळी झालेल्या चर्चेची माहिती उघड केल्यास लालूंचीच गोची होईल, असे किशोर यांनी म्हटले. मात्र, जेडीयूशी फारकत घेतलेले त्या पक्षाचे माजी अध्यक्ष शरद यादव यांनी लालूंच्या कथित दाव्याची पुष्टी करण्याचा प्रयत्न केला.

भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये फेरप्रवेश केल्यानंतर काही महिन्यांतच पुन्हा बाहेर पडण्याचा प्रयत्न नितीन यांनी केल्याची बाब खरी आहे. त्यातून विविध माध्यमांमधून वाटाघाटी सुरू होत्या. किशोरही त्यात सहभागी असावेत, अशी शक्‍यता त्यांनी व्यक्त केली.

बिहारमध्ये 2015 साली झालेली विधानसभा निवडणूक राजद, जेडीयू, कॉंग्रेस महाआघाडीने जिंकली. मात्र, राजदबरोबरची धुसफूस वाढल्यानंतर दोन वर्षांच्या आतच जेडीयू तत्कालीन सत्तारूढ महाआघाडीतून बाहेर पडला. त्यानंतर बिहारमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी जेडीयू आणि भाजप हे मित्रपक्ष पुन्हा एकत्र आले आणि जेडीयूचा एनडीएमध्ये फेरप्रवेश झाला. त्यानंतर मागील वर्षी जेडीयू आणि भाजपमधील संबंधांत कटूता निर्माण झाल्याचे वृत्त पसरले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.