पुणेरी पलटणच्या मुख्य प्रशिक्षकपदी अनुप कुमार

पुणे – पुणेरी पलटण संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी भारतीय संघाचा माजी कर्णधार अनुप कुमारची निवड करण्यात आली आहे. प्रो-कबड्डीच्या सहाव्या हंगामानंतर निवृत्ती स्विकारलेल्या अनुप कुमार आता सातव्या हंगामात प्रशिक्षकाच्या भूमिकेत पुन्हा एकदा पुनरागमन करत आहे.

प्रो-कबड्डीच्या पहिल्या 5 हंगामात अनुप कुमार याने यू मुम्बा संघाचे नेतृत्व केले होते. सहाव्या हंगामात जयपूर पिंक पॅंथर्सने अनुपला आपल्या ताफ्यात दाखल करुन घेतले. मात्र गेल्या काही हंगामात अनुपच्या कामगिरीमध्ये बरीच घसरण झाली होती. त्यामुळे सहाव्या हंगामाच्या अखेरीस अनुपने निवृत्तीचा निर्णय घेतला. यानंतर सातव्या हंगामापासून अनुप पुन्हा एकदा कबड्डीच्या मॅटवर प्रशिक्षकपदाच्या भूमिकेत दिसणार आहे.

अनुप कुमार हा प्रो-कबड्डीतला सर्वात अनुभवी खेळाडू म्हणून ओळखला जातो. आपल्या अनुभवी नेतृत्वाच्या जोरावर अनुपने भारतीय कबड्डी संघाला अनेक विजेतेपद मिळवून दिली आहेत. अनुपच्या नेतृत्त्वाखाली भारताने 2010 आणि 2014च्या आशियाई स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले होते. 2006मध्ये दक्षिण आशियाई स्पर्धेतून पर्दापण करणा-या अनुपने 2016मधील कब्बडी विश्‍वचषक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व केले होते.

त्याच्या याच अनुभवाचा पुणेरी पलटण संघाला फायदा होईल, असे मत पुणेरी पलटण संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलाश कांडपाल यांनी व्यक्त केले. दरम्यान, अनुप कुमारनेही पुणेरी पलटण संघाचे आपल्याला संधी दिल्याबद्दल आभार मानले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.