पाथर्डी -तालुक्यातील मोहोज देवढे येथे करोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेचे सर्वेक्षण अधिकारी डॉ. अमित गंभीर यांनी आज पाथर्डीला भेट देऊन आरोग्य विभागाच्या कामाचा आढावा घेतला. कंटेनमेंट झोन व्यतिरिक्त आणखी दोन किमी बफर झोन वाढवला गेल्याने मोहज देवढे परिसरातील सुमारे नऊ गावांमध्ये पथके घरोघरी जाऊन आजारी असणाऱ्या नागरिकांचा शोध घेणार आहेत.
तालुका आरोग्य विभागाकडून मायक्रोप्लॅन तयार करून सुरू असलेल्या उपाययोजनांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. मोहज देवढे गाव व त्या अंतर्गत येणाऱ्या चार वाड्या 14 दिवसांसाठी सील करण्यात आलेल्या आहेत. या कंटेनमेंट झोन व्यतिरिक्त आणखी दोन किमी बफर झोन वाढवण्याची सूचना डॉ. गंभीर यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर भगवान दराडे यांना दिल्या आहेत. मोहोज देवढे कंटेनमेंट झोन व्यतिरिक्त दोन किमी बफर झोन वाढल्यामुळे लगतच्या जांभळी, येळी, पिंपळगव्हाण, शेकटे, अकोला, करोडी, भिलवडे, दातीरवाडी, पालवेवाडी अशा सुमारे नऊ गावांचा सर्व्हे केला जाणार आहे. आरोग्य विभागाची पथके या गावातील घरोघरी जाऊन संशयित रुग्णांचा शोध घेणार असल्याचे डॉ. दराडे यांनी सांगितले.
मोहोज देवढे कंटेनमेंट झोनमध्ये एकूण सात पथके कार्यरत असून या टीमकडून दररोज सातशे आठ घरांचे सर्वेक्षण केले जाते आहे. त्यामध्ये 3353 नागरिकांचा सर्व्हे करून यापैकी कुणाला लक्षणे आढळल्यास त्यांना ग्रामीण रुग्णालयात पुढील तपासणीसाठी पाठविण्यात येत आहे.