माघ पौर्णिमेनिमित्त श्री खंडेरायाचे तब्बल चार लाख भाविकांनी घेतले दर्शन
दावडी/राजगुरूनगर – सदानंदाचा येळकोटच्या जघोष व भंडाऱ्याच्या उधळणीत निमगाव खंडोबा (ता. खेड) माघ पौर्णिमेनिमित्त न्हाले होते. दरम्यान, सुट्टी व माघ पौर्णिमे निमित्त रविवारी (दि. 9) भाविकांनी उच्चांकी गर्दी केली होती. तब्बल साडेचार लाख भाविकांनी खंडोबाचे दर्शन घेतले. दरम्यान, दर्शनासाठी मंदिराचे पूर्व, पश्चिम, दक्षिण हे तिन्ही दरवाजे भाविकांना दर्शनासाठी खुले करूनही भाविकांची गर्दी कमी होत नव्हाती.
दरवर्षी, निमगाव खंडोबा येथे तीन लाखापर्यंत भाविकांची गर्दी होते. यात यावर्षी लक्षणीय वाढ झाली आहे. जवळपास साडेचार लाख भाविक येथे आल्याचे यात्रा कमिटीच्या अध्यक्षांनी सांगितले. निमगाव येथील खंडोबा मंदिरात दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची मोठी गर्दी होती मात्र, सकाळी अकरा ते दोन वाजण्याच्या सुमारास मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी उसळली होती.
निमगाव खंडोबा येथे दरवर्षीपेक्षा जास्त भाविक आले होते. मंदिर यात्रा कमिटीच्या माध्यमातून त्यांनावेळेत दर्शन घेता यावे यासाठी राज्य पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष तथा निमगावचे पोलीस पाटील बाळासाहेब शिंदे, यात्रा कमिटीचे अध्यक्ष बबनराव शिंदे, सचिव बाबासाहेब शिंदे, संतोष शिंदे, मोहन राऊत, बबनराव थोरात, सलीम पठाण, मोहन शिंदे, बाळासाहेब शिंदे, नवनाथ तांबे, राम येळवंडे, अक्षय कौटकर, माणिक शिंदे, विद्यमान सरपंच बबनराव शिंदे, माजी सरपंच अमर शिंदे, बबनराव शिंदे व ग्रामस्थ यंत्रकमिटीचे सदस्य यांनी सोय केली होती.
कोंडी नित्याचीच
विकेंड आला की खेड घाट आणि राजगुरूनगर शहरात वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. खेड घाटातून जड अवजड वाहनाचा प्रवास धोक्याचा झाला आहे असे असताना महामार्गावरील खेड घाट बाह्यवळण रस्त्याचे काम संथगतीने सुरू असल्याने प्रवाशांमध्ये नागरिकांमध्ये मोठी नाराजी आहे. दररोज प्रवास करणारे विद्यार्थी व नोकरदार वर्गाचे मोठे हाल होत आहेत.
चोरट्यांनी केले हात साफ
दरवर्षी येथे मोठा पोलीस बंदोबस्त असतो त्यामुळे यात्रा सुरळीत पार पडते. मात्र, यावेळी बाहेरचे पोलीस न आल्याने स्थानिक पोलिसांना गर्दीचा सामना करावा लागला. या गर्दीचा फायदा घेत अनेक महिला भाविकांच्या गळ्यातील सोनाच्या दागिने हिसकावण्याच्या व दागिने चोरीच्या घटना घडल्या. त्यांनी यात्रा कमिटीकडे याबाबत तक्रारी दाखल केला आहेत.
पुणे-नाशिक महामार्ग “ब्लॉक’
खेड तालुक्यात एकाचवेळी निमगाव, खरपुडी व कडधे या गावात माघ पौर्णिमेला मोठ्या संख्येने भाविक येतात. त्यातच शनिवार रविवारची सुट्टी आणि माघ पौर्णिमा यामुळे रविवारी (दि. 9) पुणे-नाशिक महामार्गावकर सकाळपासून मोठी गर्दी होती. त्यातच खेड घाटात सिमेंट वाहतूक करणारा ट्रक बंद पडल्याने खेड घाटात दुतर्फा सुमारे पाच ते सहातास वाहतूक ठप्प झाली.
याचा परिणाम या तीन गावांत जाणाऱ्या भाविकांना बसला. तर ही घाटातील कोंडी थेट राजगुरूनगर शहरालगत आली होती. महामार्ग पोलीस व खेड पोलिसांच्या मदतीने क्रेनच्या साहाय्याने ट्रक बाजूला केल्यानंतर पाच ते सहा तास झालेली कोंडी सुटली; मात्र रात्री उशिरापर्यंत महामार्गावर धीम्या गतीने वाहतूक कोंडी होती.