मुंबई – वसंत मोरे यांचे कट्टर समर्थक समजले जाणारे निलेश माझिरे यांनी मनसेला जय महाराष्ट्र केल्यानंतर ते पुढील वाटचालीसाठी कोणता पक्ष निवडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. गेल्या काही दिवसांपासून पुणे मनसेमध्ये सुरु असलेल्या अंतर्गत कुरघोड्या समोर येत होत्या त्यालाच कंटाळून माझिरे यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. मनसे नेते वसंत मोरे यांनी देखील वारंवार पक्षाध्यक्षांच्या कानावर अंतर्गत सुरु असलेले विषय पोहचवण्याचा प्रयत्न केला होता.
अंतर्गत गटबाजीला कंटाळून पदाचा राजीनामा देणारे माझिरे राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशा देखील चर्चा काही दिवसांपूर्वी सुरु होत्या. परंतु निलेश माझिरे हे आता शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे. एका वृत्त वाहिनीने याबाबत वृत्त प्रसारित केले आहे. माझिरे हे आज वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिंदे गटात अर्थात बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
निलेश माझिरे हे वसंत मोरे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. गेल्या अनेक दिवसांपासून मोरे हे देखील पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा सुरु होत्या. अनेकदा कार्यक्रमांमध्ये डावलले जात असल्याची खंत देखील मोरेंनी बोलून दाखवली होती. माझिरे यांच्या पाठोपाठ आता वसंत मोरे देखील काही वेगळा निर्णय घेणार का याकडे सर्वसामान्यांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.