चंडीगढ, – देशातील विविध राज्यांप्रमाणे पंजाबनेही मंगळवारी निर्बंधांचे पाऊल उचलले. त्याअंतर्गत पंजाबमध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्याशिवाय, शाळा, महाविद्यालये बंद राहणार आहेत.
पंजाबमध्ये लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. अशात त्या राज्यातील करोनाबाधितांची संख्या मागील काही दिवसांपासून वाढत आहे. त्यामुळे करोना फैलाव रोखण्यासाठी विविध निर्बंध जाहीर करण्यात आले. त्यानुसार, शहरी भागांत रात्री 10 ते सकाळी 5 या कालावधीत संचारबंदी असेल.
चित्रपटगृह, रेस्टॉरंट, मॉल, संग्रहालयांमध्ये केवळ 50 टक्के उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे. स्टेडियम, क्रीडा संकुले, जलतरण तलाव, जिम बंद ठेवण्यात येतील. सरकारी आणि खासगी कार्यालयांमध्ये पूर्ण लसीकरण झालेले कर्मचारीच उपस्थित राहू शकतील.
सार्वजनिक ठिकाणी मास्क परिधान करणे अनिवार्य असेल. मास्कचा वापर न करणाऱ्यांना सरकारी किंवा खासगी कार्यालयांत कुठली सेवा मिळणार नाही. नव्याने जाहीर करण्यात आलेले निर्बंध पंजाबमध्ये 15 जानेवारीपर्यंत लागू असतील. त्यानंतर स्थिती पाहून पुढील निर्णय घेतले जाणार आहेत.