अबाऊट टर्न: निद्रानाश…

हिमांशू

सध्या अनेकांची झोप उडण्याचे दिवस आहेत. त्यावरून नेतेमंडळी भाषणांमधून एकमेकांवर टिप्पणीही करताहेत. अर्थात, टिप्पणी करणारेही सुखानं झोपत असतील असं वाटत नाही. सध्याच्या निवडणुकीच्या दिवसांमध्ये आम्हाला अशा नेत्यांच्या झोपेची सगळ्यात जास्त चिंता वाटते, ज्यांच्या मतदारसंघात 11 एप्रिलला मतदान होईल आणि निकालासाठी 23 मेपर्यंत थांबावं लागेल. एवढ्या कालावधीत शांत झोपेसाठी ही मंडळी काय करणार, असा भुंगा उगीचच डोक्‍यात फिरतो. असो, नेते आपल्या झोपेची चिंता करीत नसल्यामुळं आपण तरी त्यांच्याविषयी एवढं संवेदनशील का व्हावं, हा प्रश्‍न आहेच. तेव्हा नेत्यांची चिंता सोडून आपण सामान्य माणसांच्या झोपेबद्दल बोलू या.

“वेकफिट’ नावाच्या कंपनीनं नुकताच एक सर्व्हे केलाय आणि शहरांमध्ये, विशेषतः महानगरांमध्ये लोकांची झोप कमी होत चालल्याचं निरीक्षण नोंदवलंय. “ग्रेट इंडियन स्लीप स्कोअर्ड 2019′ या नावानं केलेल्या या सर्व्हेत मुंबईतल्या 1 हजार 500 जणांना सहभागी करून घेतलं होतं. आठ तास झोप हवीच, असं डॉक्‍टर आपल्याला नेहमी सांगत असतात. पण झोप ही काही आमंत्रण देऊन बोलवण्याची गोष्ट नव्हे. आठ तासांची हुकमी झोप डॉक्‍टरांना तरी आजकाल घेता येत असेल का? असाही प्रश्‍न आहे. मुंबईतले 36 टक्के लोक सात तासांपेक्षा कमी झोपतात, असं सर्व्हे सांगतो. सुखसुविधा जेवढ्या जास्त तेवढी झोप कमी होतेय.

मोबाइल नावाचा अवयव मानवी शरीराला चिकटल्यामुळं बरेचजण कमी झोपतात, असं सर्व्हे करणाऱ्यांचं निरीक्षण आहे. नव्वद टक्के माणसं रात्री झोपण्यापूर्वी लॅपटॉप किंवा मोबाइल चेक करत असतात. खेड्यापाड्यात मोबाइल एवढा सीरिअसली घेतला जात असेल, असं वाटत असलं, तरी काही सांगता येत नाही. पण बहुसंख्य लोकांना निद्रानाश जडत असताना, कमी झोपल्यामुळं अस्वस्थता, रक्‍तदाब, मानसिक आजार वगैरे वाढत असताना आपण या व्हर्च्युअल विश्‍वाचा पुन्हा एकदा विचार करण्यास बांधील आहोत. कारण व्हर्च्युअल झोप अजून कुणाला निर्माण करता आलेली नाही. प्रवासात झोप अनावर झाली तर तासभर झोप घेऊन पुन्हा स्टिअरिंग हातात घेणारे ड्रायव्हर आम्ही पाहिलेत. पण तो सवयीचा भाग झाला. सर्वसामान्य जीवनशैली जगणाऱ्यांना हे शक्‍य होईल असं वाटत नाही. शिवाय, एवढं उशिरापर्यंत जागून आपण ज्या प्लॅटफॉर्मवर असतो, त्या कंपन्या आपली माहिती विकणं बंद करत नाहीयेत. 54 कोटी यूजर्सचा डेटा फेसबुकसाठी काम करणाऱ्या दोन कंपन्यांनी अमेझॉनच्या सर्व्हरवर स्टोअर केल्याचं पुन्हा एकदा उघड झालंय.

फेसबुककडून अशा कंपन्यांना म्हणजे थर्ड पार्टीला एखाद्या ऍपवरून किंवा वेबसाइटवरून साइन इन करण्याची परवानगी दिली जाते. असं केल्यावर यूजर्सचा डेटा सुरक्षित राहूच कसा शकतो!

खरी झोप उडाली पाहिजे, ती अशा घटनांमुळं! आपले लाइक्‍स, शेअर्स आणि कमेन्ट्‌स याच्या साह्यानं आपल्या व्यक्‍तिमत्त्वाचा अभ्यास केला जातो आणि त्यानुसार आपल्याला ऑफर्स पाठवल्या जातात. आज ऑफर्सपुरता डेटा वापरला जातोय; उद्याचं काय सांगावं! झोपमोड अशा गोष्टींमुळं व्हायला हवी… किंवा या धास्तीमुळं रात्री वेळेवर झोप लागायला हवी. खरं तर, तुमची लाडकी गॅजेट्‌स उद्या भीतिदायक ठरू नयेत म्हणून तरी वेळेवर झोपा, असं डॉक्‍टरांनी यापुढे सांगायला हवं.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.