फक्त एकशेवीस रुपयांत बुद्धी वाढवायचे औषध

लोणंद – लोणंद येथील एका खासगी दवाखान्याच्या माध्यमातून लोकांना बुद्धी वाढविण्यासाठीच्या औषधाचा डोस पाजण्यात येत आहे. या धक्कादायक प्रकाराची माहिती आरोग्य विभागाला आहे की नाही हा प्रश्‍न सुजाण नागरिकांना पडलेला आहे.
लोणंद येथील नगरपंचायत हद्दीत असलेल्या दवाखान्यात गेले काही दिवस मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होण्यासाठी एक शिबिर चालवले जात आहे. मागील आठवड्यात लक्ष्मी रोडवर असलेल्या एका बीएचएमएस डॉक्‍टरच्या दवाखान्यातसुद्धा
आयुर्वेदिक औषधाच्या नावाखाली हा प्रकार एक बाहेरील सामाजिक संस्थेमार्फत स्थानिक डॉक्‍टरला हाताशी धरून अनधिकृतपणे चालू होता. मात्र काही जागरूक नागरिकांनी वेळीच सतर्कतेने हा प्रकार बंद पाडला.

मात्र अवघ्या दोन दिवसांत या बाहेरील संस्थेने लोणंद – सातारा रोडवरील दुसरा डॉक्‍टर शोधून आपला गोरखधंदा राजरोसपणे चालू ठेवलाय. सदर औषधविक्रीसाठी कोणतीही परवानगी दिली नसल्याचे लोणंदच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच सदर संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी देखील आपण आरोग्य विभाग अथवा नगरपंचायतची व्यवसाय करण्यासाठी परवानगी घेतली नसल्याचे मान्य केले आहे. एका सामाजिक संस्थेद्वारे लोणंदमध्ये व आजूबाजूच्या खेडोपड्यात फिरून या औषधाचे महत्व लोकांना समजावून सांगत आहेत. व सुवर्ण प्राश बुद्धीवर्धक डोससाठी 20 रु नोंदणी फी व 100 रू डोस शुल्क आकारणी करुन लोणंदकरांची लुट चालु आहे. गेल्या कित्येक दिवसात या पध्दतीने लोणंद आणि परिसरातील हजारो लोकांकडून लाखो रुपयांची माया गोळा केली असण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे.

अशा प्रकारे कोणी विनापरवाना बोगस वैद्यकीय व्यवसाय करत असेल तर त्याची आमच्याकडे तक्रार आली तर आम्ही नक्कीच याची दखल घेऊ. मात्र अशी आमच्याकडे कोणतीही तक्रार आलेली नाही. हा विषय अन्न व औषध विभागाच्या अखत्यारीत असून आमचा यात काहीही संबंध येत नाही.

अविनाश पाटील , तालुका वैद्यकीय अधिकारी

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.