पुणे -राज्यातील विविध जिल्ह्यांतील गडकिल्ले, मंदिरे व महत्त्वाची संरक्षित स्मारक संवर्धनासाठी तीन टक्के निधी जिल्हा वार्षिक योजनेतून दिला जाणार आहे. याबाबतचा निर्णय पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने घेतला आहे. या निर्णयामुळे विशेषत: पुण्यातील राजगड, सिंहगड, माणिकगड यासारख्या किल्ले, गड जेजुरी, निरानृसिंहपूर सारखी मंदिरे आणि लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर आदी महापुरुषांच्या जन्मस्थळ ही ठिकाणची जतन आणि संवर्धनाची कामे हाती घेण्यात येणार आहे.
पर्यटन विभागाने याबाबतच्या मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. संरक्षित स्मारकांच्या संवर्धनाचे प्रस्ताव तयार करण्यासाठी वास्तूचे पुरातत्वीय किंवा वास्तुशास्त्रीय महत्त्व, कालखंड, सद्यस्थिती, भेट देणारे पर्यटक, लोकप्रतिनिधी, स्थानिक, नागरिक यांची मागणी असे निकष निश्चित करण्यात आले आहेत.
राज्यात विविध कालखंडातील वास्तू, स्मारके आहेत. या ऐतिहासिक, पुरातन स्मारकांपैकी 288 स्मारके केंद्र सरकारच्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण या संस्थेने राष्ट्रीय महत्त्वाची म्हणून संरक्षित केली आहेत. तर राज्याच्या पुरातत्त्व विभागातर्फे 386 स्मारके संरक्षित म्हणून घोषित केली आहेत. संरक्षित स्मारकांच्या संवर्धनासाठी राज्यस्तरीय योजनेतील निधी तुटपुंजा असल्याने जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 2023-24 पासून पुढील तीन वर्षांसाठी तीन टक्के निधीची तरतूद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोणती कामे होणार
संवर्धनाच्या कामांमध्ये जतन संवर्धन, परीरक्षण, देखभाल दुरुस्ती, पर्यटकांसाठी सुविधा, सुशोभीकरण, रासायनिक जतन काम, माहितीफलक, दिशादर्शक फलक अशी कामे करता येतील. सहायक पुरातत्त्व संचालकांच्या प्रस्तावाला संचालक तांत्रिक मान्यता देतील. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रशासकीय मान्यता दिली जाईल. यानंतर जिल्ह्याधिकाऱ्यांकडून निधीचे वितरण कामाच्या प्रगतीनुसार पुरातत्व विभागाच्या सहायक संचालकांना करतील.
पुण्यासाठी 42 कोटींचा निधी
राज्यातील गड व किल्ले, मंदिरे व महत्वाची संरक्षित स्मारके आदींचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने पुणे जिल्हा नियोजन समितीने 41 कोटी 93 लाख रुपये प्राधान्याने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने सिंहगड, राजगड, तोरणा, चाकण, पुरंदर किल्ला, रायरेश्वर मंदिर, वाफगाव येथील होळकर वाडा या ऐतिहासिक वास्तूंचा समावेश करण्यात आला आहे.