पुणे जिल्हा : सागाच्या लाकडांची बेकायदेशीर साठवणूक

राजेवाडी ग्रामपंचायतच्या हद्दीतील घटना
मंचर – राजेवाडी (ता. आंबेगाव) येथे ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीररीत्या शेकडो सागाची झाडे वाहतूक करून त्याची साठवणूक केल्याची बाब समोर आली आहे. बेकायदेशीर लाकूड तोडणीची चौकशी करावी अशी मागणी ग्रामपंचायतीने केली आहे.
ही वृक्षतोड कुठे करण्यात आली आहे, याबाबत अद्याप माहिती नसून प्रथमदर्शनी राजेवाडीच्या खालील भागात कोलतावडे, मापोली, डिंभे या गावाला लागून असलेल्या भागात सागांचे वृक्षतोड झाल्याची शक्यता आहे. सदर झाडाची वाहतूक करून ती राजेवाडी हद्दीत टाकली जात असून तेथेच अनधिकृतपणे महावितरणच्या खांबावरून वीज कनेक्शन घेऊन त्यांची कटिंग सुरू आहे.
ही लाकडे साठवणूक करण्यासाठी किंवा कटिंग करण्यासाठी संबंधित व्यक्ती किंवा ठेकेदाराने ग्रामपंचायतीची परवानगी घेतली नसून, याची चौकशी व्हावी, अशी मागणी सरपंच व ग्रामस्थांनी केली आहे. वृक्षतोड झाल्याने पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होत असतानाही याबाबत वन विभागावर प्रश्नही उपस्थित झाला आहे.
ही ग्रामपंचायत पेसा क्षेत्रामध्ये येते, त्यामुळे वाहतुकीसाठी वन विभाग व ग्रामपंचायत यांची परवानगी घेऊन वाहतूक करावी लागते. मात्र, याबाबत ग्रामपंचायतची परवानगी घेतली नाही, दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
याबाबत सरपंच शुभांगी साबळे यांनी तहसीलदार, पोलीस, जिल्हाधिकारी, वनविभाग यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे. दरम्यान घोडेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी महेश गारगोटे म्हणाले, यासंदर्भात आवश्यक ती चौकशी करून कार्यवाही केली जाईल.





