पळवाट काढल्याने शेतकरी संतापले
समीर भुजबळ
वाल्हे – शासनाने नुकताच गायीच्या दुधाला 34 रुपये दर द्यावा, असा अध्यादेश काढला होता. या आधारे शुक्रवार (दि.21) 34 रुपयांने दूध खरेदी सुरूही करण्यात आली. मात्र खासगी दूध खरेदी संघांकडून कमी प्रतीच्या दुधाला एक रुपयाने दर रिव्हर्स करू लागल्याने पूर्वीपेक्षा कमी पैसे शेतकऱ्यांना मिळत आहेत. शासनाचा अध्यादेश हा दूध उत्पादकांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार असून धुळफेक असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून येत आहे.
शासनाने गायीच्या दुधासाठी 3.5/8.5 गुणप्रतिस 34 रुपये दर देणे बंधनकारक असेल असा अध्यादेश जारी केला.
शासनाने दोन ओळीचा अध्यादेश काढला आणि सगळे मंत्रिमंडळ स्वतःचीच पाठ थोपटून घेण्यात मग्न आहेत. अध्यादेशामुळे दूध उत्पादकांचा फायदा होण्याऐवजी नुकसानच जादा होत आहे. शासनाने 3.5/8.5 गुणप्रतिस 34 रुपये दर असा उल्लेख सोडून मार्गदर्शक नियमावली जारी केली नाही. त्यामुळे पुणे, सोलापूर, सातारा, नगर जिल्ह्यांतील प्रमुख सहकारी व खासगी दूध संघांनी आपापल्या हिशोबाने मनमानी करण्यास सुरुवात केली आहे.
3.5/8.5 गुणप्रति व्यतिरिक्त त्याखालील गुणप्रतिस किती दर द्यावा, अशी मार्गदर्शक नियमावली नसल्यामुळे दरामध्ये कपात करायला सुरुवात केली आहे. पूर्वी 3.5 फॅटच्या खालील प्रत्येक गुणप्रतिस 50 पैसेप्रमाणे कपात होती. तसेच डछऋ 8.5 खालील प्रत्येक गुणप्रतिस 30 पैसेप्रमाणे कपात होती.
आता नवीन अध्यादेशानुसार संघांनी पळवाट काढली आहे. फॅटच्या गुणप्रतिस 50 पैसे कपात तशीच ठेवली. मात्र, एसएनएफ 8.5 च्या खालील प्रत्येक गुणप्रतिस 30 पैसे ऐवजी, आता एक रुपयांने कपात करण्यास सुरू केली आहे. उदाहरणार्थ, 3.5/8.5 ला 34 रुपये दर आहे, असे समजू. त्यावेळी जुन्या दर पत्रकाप्रमाणे 3.3/8.2 दुध गुणप्रतिस 32.10 रुपये दूध दर मिळत होता. मात्र, नवीन दर पत्रकाप्रमाणे या गुणप्रतिस दुधाला 30 रुपये दर मिळत आहे. म्हणजेच 2.10 रुपये तोटा दूध उत्पादक शेतकऱ्यांचा होत आहे.
काही महिन्यांपासून दुधाच्या दरात मोठी घसरण झाल्याने शेतकरी संघटनांने आंदोलन केली होती. दरम्यान, दुग्धविकास मंत्री यांनी यावर तोडगा काढून समिती गठीत केली होती. समितीच्या अहवालानुसार, दुधाचा दर 34 रूपये देण्यासाठी आदेश काढले.
दुधाचे 30 रुपयांपर्यंत खाली आलेले दर वाढणार म्हणून, दूध उत्पादक सुखावला होता. मात्र, प्रत्यक्षात ही दरवाढ लागू झाली, त्यावेळी मात्र वेगळेच चित्र समोर आले आहे. दरवाढीत शेतकऱ्यांच्या हातात पहिल्यापेक्षा कमी पैसे पडू लागल्यावर शेतकरी संतप्त झाला आहे.
खासगी दूध संघानी दुधाचा दर चोरण्याची एक अनोखी नवीन शक्कल लढवत राज्य शासनाने निर्धारित केलेल्या साडेतीन फॅट आणि साडेआठ एसएनएफ या दुधाच्या क्वॉलिटीला दर 34 रुपये दर केला. मात्र, साडेआठपेक्षा डछऋ कमी म्हणजे 8. 4 लागला तर 1 रुपया कमी म्हणजे 33 रुपये लिटर दर शेतकऱ्यांना मिळेल, असे गणित घातले. जितका एसएनएफ कमी तितके रुपये कमी अशा पद्धतीने दर रिव्हर्स करू लागल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे.
सध्या केलेली दर वाढही फसवी असून, शेतकऱ्यांचा घात करणारी आहे. शासनाने 3-5 आणि 8-5 दुधासाठी 34 रुपये दर केला, मात्र खासगी संघानी एसएनएफ आणि फॅट मध्ये 1 रुपयांचा रिव्हर्स ठेवल्याने 30 रुपयांपर्यंत दर खाली गेले; दुधाचे दरपत्रक शासनाने ठरवून देणे गरजेचे असताना हे दरपत्रक खासगी दूध संघाने ठरविल्याने शेतकऱ्यांची घोर फसवणूक सुरु झाली आहे.
-जयवंत भुजबळ, दूध उत्पादक शेतकरी.
शासनाकडून दुधाला 34 रूपये दर निश्चित केला आहे; मात्र, “त्या’ गुणप्रतिच्या दुधासच हा दर देण्यात येत आहे. गुणप्रतिपेक्षा कमी दुधास प्रत्येक पॉईंटनुसार, दूध दरपत्रकात कमी-जास्त होत आहे. मात्र, सद्यःस्थितीत सर्वच शेतकरीवर्गाकडे जर्सी, एचएफ या प्रतिच्या गाई असलेल्या, त्याच्या दुधास शासनाने ठरवून दिलेली गुणप्रति मिळत नाही. शासनाकडे सद्यःस्थितीत प्रतवारी ही देशी गाईची आहे. यामध्ये बदल करून, जर्सी, एचएफ जातीच्या गाईच्या गुणप्रति दुधानुसार दूध दर निश्चित करावा.
– अमोल खवले, डेअरी चालक, वाल्हे.