पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – वाघोली परिसरात अभियांत्रिकीची विद्यार्थिनी भाग्यश्री सुडे हिच्या खून प्रकरणात आरोपींच्या पोलीस कोठडीत सहा दिवस वाढ करण्यात आली आहे. शिवम माधव फुलवळे ( वय २१ रा. वाघोली पुणे मु.रा नांदेड) , सुरेश शिवाजी इंदुरे (वय २३ रा. सकनूर ता. मुखेड, जि. नांदेड) व सागर रमेश जाधव (रा.हलकी ता. शिरोळा लातूर) अशी पोलीस कोठडी वाढ झालेल्यांची नावे आहेत.
आरोपींनी वापरलेला स्टिकीन्ग टेप आणि कारच्या काचांना लावण्यासाठी खरेदी केलेले काळ्या रंगाचे मॅग्नेटिक कर्टन्स कुठून खरेदी केले आहेत. ती ठिकाणे आरोपींनी दाखविली आहेत.
तसेच तिचा मृतदेह खड्डा खोदून पुरण्यासाठी वापरलेले टिकाव व फावडे जप्त करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमृत बिराजदार यांच्या न्यायालयात दिली.
दरम्यान पोलीस कोठडीची मुदत संपल्याने पोलिसांनी तिघांना न्यायालयात हजर केले. त्यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकारी वकील रेणुका देशपांडे -कर्जतकर यांनी केली.