कोपरगाव, (प्रतिनिधी): – तालुक्यातील काकडी येथील कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल या शाळेला नरेश राऊत फाउंडेशन या सेवाभावी संस्थेतर्फे नुकताच आर.ओ. प्लॅंट भेट देण्यात आला. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी पिण्याची सोय झाली असून, पालकांनी व शिक्षकांनी नरेश राऊत फाउंडेशनचे आभार मानले आहे.
काकडी व परिसरातील आजूबाजूच्या दुष्काळी गावातील गरीब, कष्टकरी व शेतकऱ्यांच्या मुलांसाठी सुमारे दोन दशकापूर्वी मा.खा.कर्मवीर शंकरराव काळे यांनी माध्यमिक विद्यालय सुरू केले. ५ वी ते १० पर्यत शिक्षण घेत असलेल्या या विद्यालयाची आजची विद्यार्थी संख्या २९७ आहे. शाळेच्या अवतीभोवती अनेक भौतिक सुविधा व निसर्गरम्य परिसर असून पिण्याच्या पाण्यासाठी असलेल्या बोरवेलला पुरेसे पाणी देखील आहे.
हे पाणी शुद्ध करून विद्यार्थ्यांना मिळावे, यासाठी यापूर्वी देखील शाळेला मदत करणाऱ्या नरेश राऊत फाउंडेशन या सेवाभावी संस्थेकडे पालक व शाळेने आर.ओ. प्लॅंटची मागणी केली होत मागणीची तातडीने दखल घेऊन नरेश राऊत फाउंडेशनचे संस्थापक नरेश राऊत यांनी पुढाकार घेत काकडीच्या न्यू इंग्लिश स्कूलला आर.ओ. प्लॅंट सप्रेम भेट दिला आहे.
नुकतेच नरेश राऊत फाउंडेशनचे संस्थापक नरेश राऊत व सचिव लक्ष्मणराव गोर्डे यांच्याहस्ते या आर.ओ. प्लॅंटचे लोकार्पण देखील करण्यात आले आहे. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर गुंजाळ, पोलीस पाटील मधुकर गुंजाळ, मल्हारवाडीचे पोलीस पाटील बाबासाहेब गुंजाळ, मुख्याध्यापक बाळासाहेब गुडघे, शगीर शेख, जयश्री पानसरे, सुजाता नेहे, साजन पोकळे तसेच काकडी व परिसरातील नागरिक व पालक उपस्थित होते.