नगर (प्रतिनिधी) – एकीकडे लोकसभा निवडणुकीची रणधूमाळी तर दुसरीकडे दुष्काळाच्या दहाकतेने जिल्हा होरपळून निघाला आहे. जिल्ह्यात पाण्याची तसेच जनावरांच्या चार्याची समस्या निर्माण झाली आहे.
या प्रश्नाकडे लोकप्रतिनिधी, तसेच प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असून जनता हैरण झाली आहे. अनेक गावचे प्रस्ताव प्रशासन दरबारी पडून आहेत. आज जिल्ह्यातील ५ लाख २२ हजार जनता टँकरच्या पाण्यावर आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून खासगी अथवा सरकारी २६८ टँंकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे.
या महिन्यात आनखी टँकरची संख्या वाढण्याची शक्यता प्रशासनाने वर्तविले आहे. जिल्ह्यात गेल्यावर्षी सरसरीपेक्षाही कमी पाऊस झाल्याने जानेवारी महिन्यापासून जिल्ह्यात टँकरच्या मागणीला सुरुवात झाली. त्यातच गेल्या काहीदिवसांपासून उन्हाचा कडाका वाढल्याने ग्रामीण भागात पाण्याचे उद्भव अचानकच कोरडे पडले आहेत. त्यामुळे दररोज पाण्याच्या टँकरच्या मागणी वाढत आहे.
त्यातच आता लोकसभाचा ज्वर वाढत असतांना दुसरीकडे पाणी टंचाईचे भीषण चित्र आहे. उन्हाच्या वाढत्या कलाहीमुळे नगरकर हैराण झाले असतांना पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना वणवण भंटकती करावी लागत आहे. जिल्ह्यात २५५ गावे व १ हजार ३९५ वाड्या वस्त्यांवर टंचाईच्या झळा जाणवत असून सर्वाधिक टंचाईच्या झळा पाथर्डी, कर्जत, पारनेर, संगमनेर या तालुक्यात जाणवत आहेत. यासाठी जिल्हा प्रशासनासह जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाला प्रशासनाला चांगलीच कसरत करावी लागत आहे.
सर्वांधिक पाणी टंचाईची तीव्रता ही पाथर्डी तालुक्यात असून निम्म्याहून अधिक तालुक्याला टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या या तालुक्यात ८० गावे ४०४ वाड्यांना ८९ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. याठिकाणी तब्बल १ लाख ६२ हजार ७४६ लोकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा होत असून तालुक्यातील निम्म्याहून अधिक लोकांची टँकरने तहान भागविण्यात येत आहे. जिल्ह्यात राहाता, राहुरी, कोपरगाव, श्रीरामपूर हे चार तालुके वगळता उर्वरित १० तालुक्यामध्ये टँकर सुरू झाले आहेत.
तालुकानिहाय गाव, वाड्या, टँकर व लोकसंख्या पुढीलप्रमाणे आहे.
संगमनेर ३१ गावे १०१ वाड्या २५ टँकर (लोकसंख्या ४५ हजार ४७१), अकोले 2 गावे २० वाड्या ५ टँकर (लोकसंख्या ७ हजार १८८), नेवासा २ गावे २ टँकर (लोकसंख्या २ हजार ५६५), नगर १९ गावे ७० वाड्या १८ टँकर (लोकसंख्या २७ हजार ६४९), पारनेर ३७ गावे २९८ वाड्या ३२ टँकर (लोकसंख्या ७८ हजार २१९),
पाथर्डी ८० गावे ४०४ वाड्या ८९ टँकर (लोकसंख्या १ लाख ६२ हजार ७४६, शेवगाव ११ गावे ६२ वाड्या १० टँकर (लोकसंख्या १३ हजार ६४), कर्जत ३८ गावे २२३ वाड्या ३४ टँकर (लोकसंख्या ७३ हजार २८५), जामखेड २२ गावे ६० वाड्या २० टँकर (लोकसंख्या ४६ हजार ३६५), श्रीगोंदा ६ गावे ६० वाड्या ९ टँकर (लोकसंख्या १५ हजार १७७).
१०९ विहीर व कुपनलिका अधिग्रहण
पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागल्याने प्रशासने गावसह टँकर भरण्यासाठी तब्बल १०९ विहिर व बोर अधिग्रहण केल्या आहेत. गावासाठी ६६ तर टँकर भरण्यासाठी ४३ विहिरी व बोर अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात मंजूर टँकर आणि होणार्या खेपा यांच्या टक्केवारी ८७.९६ टक्के खेपा पूर्ण होत आहे.