आळंदी -श्रीक्षेत्र आळंदीत कमिका एकादशीनिमित्त परंपरेप्रमाणे गुरुवारी (दि. 16) पालखी प्रदक्षिणेने माउलींचा यंदाचा आषाढी वारी सोहळा पार पडला. दरम्यान, दशमीला म्हणजेच बुधवारी (दि. 15) परंपरेप्रमाणे मंदिर प्रदक्षिणा होवून पादुका माउलींच्या समाधीजवळ विसावल्या होत्या.
माउली मंदिर करोनाच्या पार्श्वभूमीवर बंद आहे. मात्र, पुजाऱ्यांच्या उपस्थितीत पहाटे दैनंदिन पूजा विधी झाल्यानंतर दुपारी एकच्या सुमारास माउलींची पालखी प्रदक्षिणेसाठी विनामंडपातून बाहेर पडली. एकनाथ पार, गणेश मंदिर मार्गे मुक्ताई मंडपात विसावली.
यावेळी नाईकांच्या वतीने मानाच्या दिंड्या विणेकरी, मानकऱ्यांना नारळ प्रसाद वाटप करण्यात आले. दिंड्यांच्या हजेरीचा कार्यक्रम पार पडल्यानंतर पालखी सांयकाळी पावणे सहाच्या सुमारास मंदिरात दाखल झाली. आरती झाल्यानंतर देऊळवाड्यात संस्थानच्या वतीने मानकऱ्यांना नारळ प्रसाद वाटप करण्यात आल्यानंतर यंदाच्या आषाढी वारी सोहळ्याची सांगता झाली.
यावेळी पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर, राजेंद्र आरफळकर, देवस्थानचे प्रमूख विश्वस्त ऍड. विकास ढगे पाटील, विश्वस्त अभय टिळक, बाळासाहेब चोपदार, राजाभाऊ चोपदार, रामभाऊ चोपदार, चैतन्य महाराज कबीर, राहुल चिताळकर पाटील, योगेश आरु, माउली गुळुंजकर, विठ्ठल घुंडरे पाटील, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर आदी मान्यवर उपस्थित होते.