इंग्लडविरुद्धच्या टी-20 मालिकेतून ‘हा’ खेळाडू पडणार बाहेर ?

नवी दिल्ली – भारत आणि इंग्लड दरम्यान चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील शेवटचा कसोटी सामना अहमदाबाद येथे खेळला जाणार आहे. त्यानंतर 12 मार्च पासून पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेला सुरुवात होईल.

या मालिकेसाठी मागील आठवड्यात भारतीय संघाची घोषना करण्यात आली आहे. त्यामुळे भारतीय संघात फिरकीपटू वरुण चक्रवर्ती याचा देखील समावेश आहे. परंतु आता क्रिकबजच्या रिपोर्टच्या माहितीनुसार वरुण चक्रवर्ती हा टी-20 मालिकेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. कारण त्याला बीसीसीआयच्या निर्धारीत फिटनेस चाचणीत पात्र ठरता आलेले नाही. त्यामुळे भारतीय त्याला भारतीय टी-20 संघातून बाहेर केले जाऊ शकते.

यो-यो चाचणीत नापास झाला वरुण चक्रवर्ती
क्रिकबजच्या रिपोर्टनुसार वरुण चक्रवर्तीवर धोक्याचे ढग दाटले आहेत. कारण त्याने भारतीय खेळाडूंसाठी बनवलेल्या नवीन फिटनेस चाचणीत चांगले प्रदर्शन केले नाही. बीसीसीआयच्या नवीन चाचणीत 2 किमीची शर्यत 8.5 मिनिटाची आहे आणि यो-यो चाचणीत कमीतकमी 17.1 गुण मिळवायचे असतात.

मात्र या चाचणीत त्याला पात्र ठरता आले नाही. त्यामुळे क्रिकबझशी बोलताना वरुण चक्रवर्ती म्हणाला की, अजूनही तो बीसीसीआयच्या उत्तराची वाट पाहत आहे. त्यांच्या मते, आतापर्यंत कोणीही त्याला याबाबत काहीही सांगितले नाही.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून ही बाहेर पडला होता वरुण चक्रवर्ती
वरुण चक्रवर्तीने आयपीएल 2020 दमदार कामगिरी केली होती. या कामगिरीच्या जोरावर त्याची ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली होती. परंतु दुखापतीच्या कारणामुळे त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाता आले नव्हते.

त्यामुळे आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेट मध्ये पदार्पण करण्याची संधी हुकली होती. त्यामुळे तो इंग्लड विरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी पदार्पण करण्याची पुन्हा एकदा संधी गमावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण यावेळी त्याला फिटनेस टेस्ट पास होताना अडचणी येत आहेत. ज्यामुळे त्याला टी-20 संघातून बाहेर पडावे लागू शकते.

केकेआरच्या ताफ्यात सराव करतोय वरुण चक्रवर्ती
सध्या वरुण चक्रवर्ती हा केकेआरच्या सराव शिबिरात सहभागी झाला आहे. त्याला विजय हजारे ट्राफीसाठी तमिळनाडू संघात स्थान दिले नाही. ज्याचे कारण तो टी-20 स्पेशालिस्ट आहे असे सांगितले आहे. या अगोदर त्याने तीन महिने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत घालवले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.