बॅंकॉक – थायलंडमध्ये सुरू असलेल्या लोकशाहीवादी आंदोलनकर्त्यांच्या विरोधात अटकेचे वॉरंट आणि हिंसक हल्ल्यांचाही इशारा दिला आहे तरी या आंदोलकांनी आपले आंदोलन सुरूच ठेवले आहे. शुक्रवारी आंदोलकांनी पुन्हा एकदा जोरदार आंदोलन केले आणि लष्कराच्या उठावाची शक्यताच या आंदोलकांनी व्यक्त केली आहे.
लोकशाहीवादी कार्यकर्त्यांच्या अंदोलनामध्ये आतापर्यंत दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. मात्र हा हिंसाचार आंदोलानदरम्यान झालेल्या मोर्च्यातूनच उदभवला असल्याबद्दल शंका आहे. लोकशाहीवादी मागण्या करणारे विद्यार्थी अधिक आक्रमक झाले आहेत.
पंतप्रधान प्रयुथ चान-ओचा आणि त्यांच्या सरकारने राजीनामा द्यावा, अशी आंदोलकांची मुख्य मागणी आहे. त्याशिवाय अधिक लोकाभिमुख होण्यासाठी राज्यघटनेत सुधारणा करण्यात यावी आणि राजसत्तेत सुधारणा केली जावून अधिक जबाबदार बनवले जावे, अशीही मागणी आंदोलक करत आहेत.
राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांपेक्षा राजघराण्याकडे अधिक व्यापक अधिकार आहेत, असा आरोप आंदोलक करत आहेत. लष्कराने मात्र राजघराण्याच्या संरक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे.