पुणे – सध्या अतिविषारी असलेल्या घोणस सापांच्या मिलनाचा कालखंड सुरू आहे त्यामुळे आज रविवार दि. 29 रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास जुन्नर तालुक्यातील नारायणगाव खोडद दरम्यान असलेल्या इंद्रजीत आपार्टमेंट जवळ दोन घोणस जातीचे अति विषारी साप आढळून आले निलेश भंडारे यांनी या दोन्ही सापांना पकडून वनविभागाच्या हवाली केले.
नारायणगाव येथील भरवस्तीत असलेल्या खोडद रस्त्यावरील इंद्रजीत आपारर्टमेंट जवळ दोन घोणस जातीचे साप असल्याचे येथील युवक रोहन वाजगे आणि नाना कदम यांना आढळून आले त्यांनी तात्काळ सर्पमित्र भंडारे यांना भ्रमणध्वनी करून घटनास्थळी बोलावले त्यावेळी पूर्ण वाढ झालेल्या घोणस जातीच्या सापांना त्यांनी शिताफीने पकडले आणि वन विभागात स्वाधीन केले
दरम्यान, सध्या थंडीचा कालखंड सुरू आहे आणि याच काळात अतिविषारी समजल्या जाणाऱ्या घोणस जातीच्या सापांचा मिलनाचा कार्यकाळ चालू आहे अशा परिस्थितीत हे घोणस जातीचे अति विषारी साप घराजवळ त्याचबरोबर वीट भट्टी आदी परिसरात दिसून येतात.
मात्र या विषारी सापांना शक्यतो न मारण्याचा नागरिकांनी प्रयत्न करावा असे विषारी जातीचे घोणस साप आढळून आल्यास तात्काळ वनविभागाला किंवा सर्पमित्रांना पाचारण करावे असे आवाहन सर्पमित्र निलेश भंडारे यांनी केले आहे.