चेन्नई – दक्षिणेकडील सुपरस्टार रजनीकांत यांनी तामिळनाडु विधानसभेची आगामी निवडणूक लढवण्यास नाखुषी दर्शवली असली तरी समर्थकांनी त्याविषयी सतत आग्रह धरल्याने त्यावर निर्णय घेण्यासाठी रजनीकांत यांनी आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक उद्या सोमवारी बोलावली आहे. त्या बैठकीत निवडणूक लढवण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे असे सांगण्यात येते.
रजनीकांत यांनी रजनी मक्कल मंद्रम नावाचा एक पक्ष स्थापन केला आहे. त्या पक्षाच्या सर्व जिल्हा सेक्रेटरींनी त्यांनी सोमवारी चर्चेसाठी पाचारण केले आहे. ही बैठक ऑनलाईन पद्धतीने होईल की थेट स्वरूपात हे अजून स्पष्ट करण्यात आलेले नाही.
कोविडचा प्रादुर्भाव आणि रजनीकांत यांची सध्याची आरोग्य स्थिती यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीच्या राजकारणात त्यांना उतरता येईल की नाही या विषयी त्यांनी स्वता:च साशंकता व्यक्त केली होती. त्यांना डॉक्टरांनीही राज्यभर प्रचार दौरे करण्यास मनाई केली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीच्या राजकारणात उतरायचे की नाहीं यावर त्यांचे अजून ठाम मत बनलेले नाही. सोमवारी त्यांच्याकडून काही ठोस निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.